यवतमाळ जिल्ह्यातही संपूर्ण दारूबंदी करावी, या प्रमुख मागणीसाठी वेगवेगळ्या संघटना, व्यक्ती, संस्था, सामाजिक कार्यकत्रे, स्वयंसेवी संघटनांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील शेकडो महिलांनी गावोगावी आणि शहराशहरातून विशाल मोच्रे काढले आहेत. महिलांच्या या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषदेने संपूर्ण जिल्हा दारूबंदीचा ठराव करून महिलांना ‘हम तुम्हारे साथे है’ चा संदेश दिला. आता तर जिल्हा विकास समितीच्या सभेतही महिलांच्या दारूबंदीच्या मागणीला पाठिंबा देणारा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बचतभवनात झालेल्या सभेत केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, सेना खासदार भावना गवळी आणि खासदार सचिन सावंत यांच्यासह भाजपच्या मदन येरावार, संजय रेड्डी, अशोक उईके, राजू तोडसाम, राजू नजरधने, राष्ट्रवादीचे आमदार मनोहर नाईक व संदीप बाजोरिया, ख्वाजा बेग, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे या आमदारांनीही ठरावाचे जोरदार समर्थन केले. महिलांच्या या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी सक्रिय पािठबा देऊन या मागणीचे जोरदार समर्थन केले. यवतमाळ जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी व्हावी, या मागणीसाठी महिलांनी उभारलेल्या अद्भूत आंदोलनाला पूर्ण पािठबा असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी त्यांना भेटलेल्या आंदोलक महिलांना सांगितले.

महिलांमध्ये हत्तीचे बळ संचारले
जिल्ह्यात दारूबंदीसाठी महिलांच्या प्रचंड आंदोलनाला लाभलेल्या वाढत्या समर्थनामुळे आमच्यात हत्तीचे बळ आले असून दारूबंदी होईपर्यंत शांत बसणार नाही, अशी प्रतिक्रिया आंदोलनाचे नेतृत्व करणारे संगीता पवार, प्रा.घनश्याम दरणे, उमेश मेश्राम, प्रज्ञा चौधरी, महेश पवार, प्रभा इंगोले, बाळासाहेब सरोदे, प्राचार्य डॉ. रमाकांत कोलते, एकनाथ डगवार आदींनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात कधी नव्हे एवढा या आंदोलनाला पाठिंबा मिळत असल्याने सरकार दखल घेईल, अशी आशाही या नेत्यांनी व्यक्त केली आहे. आंदोलकांची मागणी अत्यंत रास्त असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनीही वार्ताहर परिषदेत व्यक्त केली आहे. व्यसनमुक्तीच्या लढय़ात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी पुरस्कारही दिले जातात. कायद्याने झालेल्या दारूबंदीपेक्षा समाज प्रबोधनाने होणारी दारूबंदी अधिक परिणामकारक होत असते, असे प्रांजळ मत माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केले आहे. मोघे म्हणाले की, आंदोलनाबाबत सामाजिक प्रबोधन झाल्याशिवाय दारूबंदी लवकर होणार नाही.