राज्य उत्पादन शुल्क कार्यालय फोडून टाळेबंद करून ठेवलेल्या एक लाख ४१ हजार रुपयांच्या देशी-विदेशी दारूची चोरी झाल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

वाई कार्यक्षेत्राचे कामकाज अनेक वर्षे कार्यालयातून सुरू होते. मात्र कमी मनुष्यबळामुळे २०१८ मध्ये सातारा येथे मुख्य कार्यालयात विलीन करण्यात आले. या विभागाने वाई, पाचगणी व महाबळेश्वर परिसरात कारवाईत जप्त केलेल्या देशी-विदेशी दारूचा साठा या कार्यालयात ठेवण्यात आला होता. गुरुवारी मध्यरात्री चोरटय़ांनी कार्यालयाचा मुख्य दरवाजा तोडून कार्यालयात ठेवलेल्या देशी दारूच्या सुमारे ९०० भरलेल्या बाटल्या व ६७ हजार ४८० रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या असा एक लाख ४१ हजार ४८० रुपयांचा मालाची चोरी झाल्याची जवान उदयसिंह जाधव (रा. बावधन ता. वाई) यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. मध्यवस्तीत व मुख्य रस्त्यावर हे कार्यालय असताना व परिसरात पोलीस बंदोबस्त असताना चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दुसऱ्या घटनेत सैदापूर (ता. सातारा) येथील निकी बंट्स बिअर बार फोडून चोरटय़ांनी दारूच्या बाटल्या, सीसीटीव्ही डीव्हीआर, मोडॅम व रोख रक्कम असा सुमारे ७१ हजार ४४० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.२६ मार्चपासून त्यांचा बार बंद आहे. तेव्हापासून ते २९ मार्च या कालावधीत चोरटय़ांनी बारचे कुलूप फोडून दारूच्या एक हजार १०३ बाटल्या, सीसीटीव्ही डीव्हीआर, मोडॅम व रोकड लंपास केल्याची फिर्याद प्रवीण अंकुश पवार (रा. सैदापूर, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंदविली आहे.