प्रशांत देशमुख

वर्धा : महात्मा गांधी यांचे प्रेरणास्थळ म्हणून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात आज गांधी जयंतीलाच लाखो रूपये किंमतीची चोरट्या वाटेने येणारी दारू जप्त करण्यात पोलिसांना यश आले.  महात्मा गांधी यांची पुण्यभूमी असल्याने एक आदर्श म्हणून वर्धा जिल्ह्यात अनेक वर्षांपासून दारूबंदी आहे. मात्र असे असूनही चोरटी दारू वाहतूक व जिल्ह्यातच हातभट्टीतून निघणारा दारूचा महापूर नवा नाही. मात्र आज गांधी जयंतीलाच दारूसाठा आणणाऱ्या वर्धा येथील दारू विक्रेता विक्की जयस्वाल याच्यावर कारवाई झाली.

यवतमाळ येथून पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये वर्धा यथे दारू येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वर्धा पोलिसांनी या गाडीला वर्ध्याजवळ गिरोली येथे नाकाबंदी करून थांबण्याचा इशारा दिला. मात्र पोलीस दिसताच आरोपीने गाडी वळवून दूरूनच पळण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिसांना शेतात ही कार सापडली. आरोपी मात्र पळ काढण्यात यशस्वी झाले. गाडीची तपासणी केल्यानंतर देशी दारूच्या १ हजार ४४०  बाटल्या आढळून आल्या. त्याची किंमत १ लाख ४४ हजार रूपये व गाडीची किंमत ३ लाख असा जवळपास साडेचार लाखाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करण्यात आला. गाडीमालक जयस्वाल याच्यावर गुन्हे दाखल केले. नवनियुक्त पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधिक्षक नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात निरिक्षक निलेश ब्राम्हणे, पोलीस शिपाई नरेंद्र डहाके, संतोष दरगुडे, हरिदास काकड, वैभव कट्टोजवार, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे आदींच्या चमूने पाठलाग करीत ही यशस्वी कारवाई केली.