राज्यातील विविध ठिकाणी घरगुती आणि मानाच्या गणपतीच्या विसर्जन रात्री उशीरापर्यंत सुरु होते. बुलढाण्यात आदर्शनगर बाल गणेश मंडळाच्या मिरवणुकीवर मधमाश्यांनी हल्ला केल्याने ३५ जण जखमी झाले आहेत. यात २० लहान मुलं आणि इतर १५ जण जखमी झाले आहेत.

आदर्शनगर बालगणेश मंडळाच्या गणपतीची मिरवणूक निघाली होती.विहिगाव नदीजवळ मिरवणूक दाखल होताच मधमाशांनी मिरवणुकीवर हल्ला केला. यात घाबरुन काही लोकांनी थेट नदीत उडी मारुन आपला जीव वाचवला. तर काही जण या हल्ल्यानंतर सैरावैरा पळू लागले. शेवटी मधमाशा निघून गेल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान राज्यभरात सकाळपासून पावसाने हजेरी लावली होती.  औरंगाबादमध्ये मानाच्या संस्थान गणपतीच्या आरतीनंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. बँडच्या तालावर खासदार चंद्रकांत खैरै यांनीही फेर धरला. यंदा वरुणराजाने मराठवाड्यावर कृपादृष्टी दाखवावी आणि जायकवाडी धरण संपूर्ण भरावे असे साकडे गणरायाला घातल्याचे खैरे यांनी सांगितले. नाशिक, सोलापूर, कोल्हापूर आदी ठिकाणी गणेश विसर्जन जल्लोषात पार पडले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, या गजरात भावपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पाला भाविक निरोप देत होते.  कोल्हापुरातील मानाचा गणपती तुकाराम माळी बाप्पाच्या मिरवणुकीस सकाळी ८.३० वाजता प्रारंभ झाला. यंदा कोल्हापुरात प्रशासनाने दिलेल्या डॉल्बीमुक्त मिरवणुकीला मंडळांनीही चांगला प्रतिसाद दिला. यावेळी मिरवणुकांमध्ये पारंपारिक वाद्याबरोबर लेझर शो, लाईटसचा मोठा वापर होत आहे. तसेच विविध नृत्यांचे सादरीकरण ही केले जात आहे. कोल्हापुरात मिरवणूक मार्गावर २६ सीसीटीव्ही लावले असून पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
सोलापूर शहरात सकाळपासूनच घरगुती गणेश विसर्जनास सुरूवात झाली. येथील श्री सिद्धेश्वर तलाव, धर्मवीर संभाजी तलाव व विडी घरकुल येथे गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. मानाचा आजोबा गणपतीची पूजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. सोलापुरात २००० गणेश मंडळांची नोंदणी झाली आहे. सकाळपासूनच रिमझिम पावसास सुरूवात झाली होती. बंदोबस्तासाठी सुमारे ३ हजार पोलिंसाची नियुक्ती करण्यात आली आली आहे.
नंदूरबार मिरवणुकीत पारंपारिक गोफ नृत्य करत बाप्पांना निरोप. संगमनेरमध्ये डॉल्बीविरहीत गणेशाची विसर्जन मिरवणूक सुरू आहे. मानाच्या सोमेश्वर मंडळाच्या प्रस्थानानंतर गावात मिरवणुकींना प्रारंभ झाला. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आदी नेत्यांच्या घरातील गणपतीचेही विसर्जन करण्यात आले. राज्यात सर्वत्र मिरवणुकींमध्ये सैराटच्या गाण्यांची जादू दिसून आली.