महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत मंजूर केलेल्या प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकास कमिशन दिले नाही, म्हणून कर्ज मंजूर केले नाही, असा आरोप करीत सतीश अशोक मोरे या बेरोजगार तरुणाने बँकेच्या लोकपालाकडे तक्रार अर्ज दाखल केला. बुलढाणा जिल्ह्य़ाच्या किनगावराजा शाखेतील व्यवस्थापकाविरोधात तक्रार करूनही काहीच उपयोग न झाल्याने या तरुणाला नोकरीसाठी गाव सोडावे लागले. तो सध्या औरंगाबादला खासगी कंपनीत काम करीत आहे.
बुलढाणा जिल्ह्य़ाच्या सिंदखेडराजा तालुक्यातील केशव शिवणी येथील सतीश मोरे यांनी महामंडळाकडे डीटीपी, इंटरनेट कॅफे, झेरॉक्स व फोटोग्राफी या व्यवसायासाठी १० लाखांचे कर्ज मागितले होते. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळानेही कर्ज देण्यास हरकत नसल्याची शिफारस बँक ऑफ महाराष्ट्रकडे केली. तेव्हा त्यांना व्यवस्थापकाने कमिशन मागितले. ते न दिल्याने कर्ज दिले गेले नाही. आर्थिक व तांत्रिकदृष्टय़ा कर्ज मंजूर करणे शक्य नाही, म्हणून क्षेत्रीय कार्यालयाने प्रकरण निकाली काढल्याचे सांगत मोरे यास कळविण्यात आले. किनगावराजा येथील बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्ज प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्याचे कळविण्यात आले. बँकेच्या दोन अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्राच्या उत्तरात तफावत असल्याचा आरोप मोरे यांनी केला.