महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात स्थानिक न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. राज ठाकरेंविरोधात सुरू असलेल्या खटल्याप्रकरणी अनेकवेळा सुनावणीसाठी गैरहजर राहील्याने हे अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी ८ मे रोजी होणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या(एमआरटीसी) बसवर जालना-औरंगाबाद मार्गावर २० ऑक्टोबर २००८ रोजी मनसे कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यांनतर बस चालक अब्राहीम शेखने स्वत:हून कर्माड पोलीस ठाण्यात राज ठाकरेंविरोधात तक्रार केली. त्यानुसार राज ठाकरे आणि इतर सहा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच पोलिसांनीही तक्रारीची दखल घेत सर्व आरोपींवर आरोपपत्र दाखल केले.
त्यानंतर सदर प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान राज ठाकरे न्यायालयात गैरहजर असायचे आणि न्यायाधीश अशोक सोनी यांच्याकडे राज यांच्याकडून न्यायालयात सुनावणीवेळी गैरहजर राहण्याची परवानणीची मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर राज लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात व्यस्त होते. आता न्यायालयाने राज यांच्याकडून करण्यात आलेली गैरहजर राहण्याची सवलतीची याचिका फेटाळून लावली तसेच सोबत अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.