वारंवार मुदतवाढ देऊनही न्यायालयात हजर न राहणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात येथील न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे.
८ मे रोजी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार असून, ठाकरे यांची मुदतवाढीची विनंती यावेळी फेटाळण्यात आली आहे. २० ऑक्टोबर २००८ रोजी जालन्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या राज्य परिवहन सेवेच्या बसवर मनसे कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. याप्रकरणी ठाकरेंसह सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून आजवर राज ठाकरे न्यायालयात उपस्थित राहण्यास असमर्थ ठरले आहेत. यावेळीही निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र असल्याने आपल्याला उपस्थित राहण्यास मुदतवाढ मिळावी, अशा मागणी राज यांच्यावतीने करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्र राज्यातील निवडणुका संपल्याने आता मुदतवाढ दिली जाणार नाही, असे सांगत न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले.