– संदीप आचार्य

मुंबई- पुण्यासह राज्याच्या अनेक भागात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे हे लक्षात घेता राज्यातील करोनाबाधित शहरात लॉकडाऊनचा काळ वाढवला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मांडली. अर्थात केंद्र सरकारशी व मंत्रिमंडळातील चर्चेनंतर याबाबतचा निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.

तेलंगणासह अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. मुंबई- पुण्यासह राज्याच्या अनेक भागात करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. काही शहरांमधील संख्या वेगाने वाढताना दिसत असल्यामुळे तेथील भागातही संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येत आहे. राज्य सरकारने खबरदारीच्या अनेक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. राज्यात दोन हजाराहून अधिक पथके जागोजागी सर्वेक्षणाचे काम करत आहेत. आयुषच्या सव्वा लाख डॉक्टरांना करोनाबाबत प्रशिक्षण देण्याचे कामही सुरु आहे. देशातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण जास्त आहेत. त्यातही मुंबई व पुण्यात रोजच्या रोज रुग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी १४ एप्रिल रोजी २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची मुदत संपत असली तरी रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता किमान मुंबई – पुण्यासह जेथे करोनाचे रुग्ण वाढत आहेत तेथे लॉकडाऊनचा कालावधी वाढवलाच पाहिजे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांशी याबाबत चर्चा होत असते. राज्याची आर्थिक स्थिती व लोकांचे आरोग्य याची कशी सांगड घालायची यावरही बोलणे होते. मात्र सध्याचा लॉकडाऊन किमान करोनाबाधित शहरांमध्ये वाढवला पाहिजे असे सर्वांचेच मत दिसून येते असेही आरोग्यमंत्री म्हणाले. अर्थात आजच याबाबत निर्णय घेता येणार नाही तर १२ एप्रिलपर्यंत परिस्थितीचा आढावा घेऊन मगच निर्णय घ्यावा लागेल. केंद्रसरारशीही याबाबत बोलावे लागेल. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन व आयसीएमआरच्या उच्चपदस्थांशी आपले जवळपास रोज बोलणे होत असून केंद्राकडून महाराष्ट्राला जास्तीत जास्त करोना संरक्षित सुट, मास्क आदी बाबी मिळाव्या यासाठी पाठपुरावा करत असल्याचेही आरोग्यमंत्री म्हणाले. आयसीएमआर वा केंद्राकडून रॅपिड करोना चाचणीबाबत सूचना असल्या तरी वैद्यकीय शिक्षण विभाग व आरोग्य विभागाचे काही ज्येष्ठ अधिकारी करोनाच्या या रॅपिड चाचणीसाठी अनुकूल नाहीत. या अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार रॅपिड चाचणीच्या अचुक निष्कर्षाचे प्रमाण ४० टक्के एवढे आहे. तथापि व्यापक प्रमाणात चाचणी करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यास रॅपिड चाचणीचा पर्याय वापरावा लागेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

करोनाच्या रुग्णांची संख्या वाढणार नाही तसेच करोनाला अटकाव करण्यासाठी लॉकडाऊन हाच प्रभावी उपाय आहे. देशभरात ६२ जिल्ह्यामध्ये करोनाचा प्रभाव असून २४७ जिल्ह्यात करोनाने हातपाय पसरले आहेत.

राज्यात आजघडीला सुमारे दोन लाखाहून अधिक स्थलांतरित वेगवेगळ्या जिल्ह्यातील छावण्यांमध्ये राहात आहेत. त्यांच्या जेवण्याखाण्याची व्यवस्था राज्यसरकार पाहात असून अनेक स्वयंसेवी संस्थांची यात मोठी मदत होत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान तसेच दक्षिणेतून येथे कामासाठी आलेले अनेक स्थलांतरित पायीच आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यास यातील ज्या स्थलांतरितांना त्यांच्या राज्यात परत जावयाचे आहे त्यांच्यासाठी राज्यनिहाय रेल्वे अथवा बसेसची व्यवस्था करण्याबाबतही नियोजन करावे लागेल. आज राज्यातील अनेक जिल्ह्यात वेगवेगळ्या छावण्यांमध्ये हे स्थलांतरित राहात अाहेत. ज्या शहरात व भागात करोनाचे रुग्ण जास्त आहेत तेथील लॉकडाऊनचा कालावधी वाढवून अन्यत्र लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यास जेथे लॉकडाऊन नाही तेथील स्थलांतरितांना त्यांच्या राज्यात कसे पाठवायचे याचाही निर्णय करावा लागेल. राज्यातील तसेच अन्य राज्यातील खासदारांकडून याबाबत विचारणा होत आहे. संबंधित राज्यातील सरकारांशी बोलून याबाबत योजना तयार करता येईल, असेही राजेश टोपे म्हणाले.