सोलापुरात तिघांना अटक

सध्या अनेक ठिकाणी भर रस्त्यावर वाढदिवसाचा केक कापण्यासाठी चक्क तलवारींचा वापर केला जात असल्याच्या घटना पाहावयास मिळत आहेत. ‘मुळशी पॅटर्न’मधून निर्माण झालेले हे लोण हळूहळू सर्वत्र पसरत सोलापुरातही आले आहे. एवढेच नव्हे तर वाढदिवसाचा केक कापण्यासाठी चक्क तलवारीच भाडय़ाने देण्याचा उद्योगही सोलापुरात सुरू झाल्याचे उजेडात आले आहे. एका घटनेत पोलिसांनी हस्तक्षेप करून वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवारी भाडय़ाने देण्याचा धंदा करणाऱ्या तिघा जणांना अटक केली आहे.

शहरातील पूर्व भागात अशोक चौकाच्या पुढे सत्तर फूट रस्त्यावर इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात तिघे जण एका पोत्यात तलवारी बांधून निघाल्याची माहिती मिळाल्यावरून शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तेथे सापळा रचला. त्यात तिघा संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे एका पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक पोत्यात दोन तलवारी आढळून आल्या. सागर संतोष गुजले, गेनसिद्ध सिद्धाराम चाबूकस्वार व सचिन शरणप्पा कोळी (तिघे रा. सोलापूर) अशी या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी अधिक चौकशी केली असता पोलीस यंत्रणेलाही आश्चर्य वाटले. यातील सचिन गुजले याने, वाढदिवसाचा केक कापण्यासाठी आपण इतर तरुणांना तलवारी भाडय़ाने देतो, अशी माहिती दिली. त्याप्रमाणे दोन तलवारी भाडय़ाने देण्यासाठी आम्ही घेऊन चाललो होतो, अशी कबुली तिघा संशयितांनी दिली. या तिघा जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. शहर गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील व सहायक पोलीस निरीक्षक वैभव माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अलीकडे समाजात तरुणांमध्ये झुंडशाही वाढली असून गल्लीबोळात, चौकात, नाक्यावर झुंडशाहीचा प्रत्यय येतो. अण्णा, बाबा, अप्पा, बापू, साहेब, मालक, काका, भाऊ अशा वेगवेगळ्या नावांनी तथाकथित तरुण पुढाऱ्यांच्या टोळ्या सक्रिय दिसतात. समाजसेवेचा आव आणत गुन्हेगारी कारवाया करून समाजात ज्या त्या भागात स्वत:ची दहशत निर्माण करणाऱ्या या टोळ्यांकडून वाढदिवसाचा केक कापण्यासाठी भर रस्त्यावर तलवारींचा वापर केला जातो. त्या वेळी तलवारी उंचावत नाचविल्या जातात. फटाक्यांची आतषबाजी होऊन टगेगिरीही केली जाते. ‘मुळशी पॅटर्न’ म्हणून त्याकडे पाहिले जाते.

लोण सोलापुरात

दोन महिन्यांपूर्वी शहरातील जुन्या एम्प्लॉयमेंट चौकाजवळ भर रस्त्यावर रात्री वाहतुकीला अडथळा आणत काही तरुण वाढदिवसाचा केक कापताना चक्क तलवारी हातात घेऊन नाचत होते. तलवारीने केक कापताना जल्लोष केला जात होता. तेव्हा पोलिसांनी संबंधित तरुणांना जागेवर पकडून अटक केली होती. त्यानंतर आता वाढदिवसाचा केक कापण्यासाठी चक्क तलवारीच भाडय़ाने देण्याचा उद्योग सुरू झाल्याने सोलापूरकरही अचंबित झाले आहेत.