महाविद्यालयीन रंगकर्मीच्या सळसळत्या उत्साहाची प्रचिती अनुभवयास मिळालेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय स्पर्धेच्या नाशिक केंद्रावरील प्राथमिक फेरीतून पाच एकांकिकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. नाशिक विभागीय अंतिम फेरी आठ डिसेंबर रोजी येथील महाकवि कालिदास कलामंदिरात रंगणार आहे.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने आयोजित आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या दिवसावर शहरी भागाचे वर्चस्व ठळकपणे दिसून आले.
आपल्यापुढील अनेक समस्यांवर मात करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अभिनयाचा उत्तम आविष्कार पहिल्या दिवशी सादर केला होता.
दुसऱ्या दिवशी शहरी भागातील रंगकर्मीच्या कलेचा कस लागला. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील महाविद्यालयीन रंगकर्मीना पुढे नेणारी ही नाटय़ चळवळ यापुढेही जोमाने सुरू राहावी, अशी अपेक्षा स्पर्धकांनी व्यक्त केली.
वैशिष्टय़पूर्ण प्राथमिक फेरी
‘अस्तित्व’ संस्थेचे सहकार्य आणि ‘झी मराठी’ वाहिनीचे माध्यम प्रायोजकत्व लाभलेल्या या स्पर्धेची प्राथमिक फेरी विविध कारणांसाठी वैशिष्टय़पूर्ण ठरली. विषयाचे वेगळेपण जपण्यासह नाटय़ सादरीकरण उत्तम व्हावे, आपण कुठे कमी पडू नये यासाठी सर्व लहानसहान कामे हे तरुण नाटय़कर्मी आनंदाने करताना दिसून आली.  
बुधवारी सिन्नरसह नाशिक शहरातील सहा महाविद्यालयांच्या एकांकिका सादर झाल्या. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याच्या उपक्रमास स्पर्धकांसह परीक्षकांनीही विशेष दाद दिली.

रंगमंचावर स्वतची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या नवोदित कलाकारांचा कस पाहण्याची संधी लोकांकिकेच्या माध्यमातून मिळाली. स्पर्धेमुळे छोटय़ा गावातील रंगकर्मीना नाटकाचा कट्टा आपलासा वाटू लागला आहे. स्पर्धेत सहभागी कलावंतामध्ये अभ्यासाची उणीव भासते. आर्थिक गणित आणि व्यावसायिक दृष्टिकोनामुळे ग्रामीण भागात नाटक पोहोचू शकलेले नाही, याचे वाईट वाटते. स्पर्धेतील उत्साही कलाकारांना निवडून त्यांना पैलु पाडण्याचे काम केल्यास नवीन उत्तम रंगकर्मी नाटय़क्षेत्राला मिळतील. लोकसत्ताने या माध्यमातून नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देत ही सुरूवात केली आहे.
-श्रीरंग देशमुख (प्रतिनिधी, आयरिस संस्था)

रंगकर्मीची नवी फळी तयार होईल
स्पर्धेमुळे रंगकर्मीची एक नवीन फळी तयार होत आहे. काही जणांकडे कलाकार म्हणून सर्व भौतीक गोष्टी पुरेशा प्रमाणात आहेत. परंतु काहींना छोटय़ा गोष्टीसाठीही तडजोड करावी लागत असल्याचे या स्पर्धेतून दिसून आले. असे असले तरी दोघांमध्ये काहीतरी करून दाखविण्याची अनोखी जिद्द आहे. त्या जिद्दीला परीक्षक म्हणून सलाम.
-प्रशांत हिरे (परीक्षक)

नाशिक विभागीय फेरीसाठी एकांकिका
*पाठवण – हं. प्रा. ठा महाविद्यालय, नाशिक
*इटर्नल ट्रूथ –  न. ब. ठाकूर विधी महाविद्यालय, नाशिक
*खरा जाणता राजा – दांडेकर कला, वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सिन्नर
*हे राम – क. का. वाघ परफॉर्मिग आर्टस महाविद्यालय, नाशिक
*तहान – हिरे महाविद्यालय, पंचवटी

तरूणाईला सामाजिक भान
स्पर्धा खूपच छान झाली. प्रत्येक एकांकिकेचा विषय वेगळा होता. सामाजिकतेसह ऐतिहासिक विषयाला हात घालत असतांना सद्यस्थितीशी सांगड घालत भाष्य करण्याचा प्रयत्नही दिसून आला. स्पर्धेमुळे तरूणाईला सामाजिक भान आहे, त्याविषयी आवाज उठविण्याची त्यांची तयारी आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. युवा वर्गाने अशा पध्दतीने हे विषय हाताळणे हे परीक्षक म्हणून आमच्यासाठी सुखावह आहे.
-चारूदत्त कुलकर्णी (परीक्षक)