एरवी सुनसान असणारे न्यू टिळक रस्त्यावरील डॉ. आंबेडकर स्मारकाचे सभागृह आणि हा परिसर शुक्रवारी मात्र तरुणाईच्या उत्साहाने प्रफुल्लित झाला होता. निमित्त होते, ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धाचे. नगर केंद्रावरील प्राथमिक फेरी शुक्रवारी पार पडली. वेगळेपण राखलेल्या या स्पर्धेचा श्रीगणेशा झाला, त्या कायम व्हाव्यात, ही स्पर्धकांची पहिली प्रतिक्रिया होती.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने राज्यातील नऊ केंद्रांवर राज्यस्तरीय ‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतर महाविद्यालयीन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. ‘अस्तित्व’ संस्थेचे सहकार्य या उपक्रमाला लाभले असून झी मराठी वाहिनी माध्यम प्रायोजक आहे.
नगर केंद्रावर शुक्रवारी प्राथमिक फेरी पार पडली. न्यू टिळक रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात लोकांकिका सादर झाल्या. सकाळच्या बोचऱ्या थंडीमुळे काहीसा विलंबाने लोकांकिकांची प्राथमिक फेरी सुरू झाली, मात्र पुढे एकापाठोपाठ एकेक संघ येथे येऊन धडकल्याने काही वेळातच हा परिसर नाटय़प्रेमींनी भरून गेला. सादर झालेल्या आठ लोकांकिकांमधून शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांचे सांस्कृतिक प्रतिबंब या स्पर्धेत उमटले. त्यावर प्रभाव शहरी भागाचा होता, मात्र ग्रामीण भागातील संघांचीही तयारी प्रामाणिक होती. कोपरगाव आणि पारनेरसह नगर शहरातील सहा, अशा आठ महाविद्यालयांचे संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. कोपरगावच्या के. जे. सोमय्या महाविद्यालयाने मोठय़ा नेपथ्यासह लोकांकिका सादर करून स्पर्धेत वेगळेपण राखले.
ग्रामीण भागातील स्पर्धकांना नगर शहरातील लोकांकिकांच्या सादरीकरणाचेही आकर्षण होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच संघांमधील कलावंतांना विशेष भावले ते स्पर्धेचे नेटके नियोजन आणि यातील सुसूत्रता. विशेषत: ग्रामीण भागातून आलेल्या स्पर्धकांना स्पर्धेचे हे वेगळेपण वाटले. महाविद्यालयाच्या ओळखपत्रासह संबंधित सर्वच गोष्टींच्या पूर्ततेने अशा स्पर्धामध्ये अभावानेच दिसणारी शिस्तही स्पर्धेला साजेशी होती, असे कोपरगावच्या संघातील आकाश खंडागळे याने सांगितले.
सकाळच्या सत्रात तीन आणि नंतरच्या सत्रात पाच अशा आठ एकांकिका या प्राथमिक फेरीत सादर झाल्या. शहराच्या नाटय़क्षेत्रातील अनेकांनी या दरम्यान येथे हजेरी लावून स्पर्धकांसह संयोजनाबाबतही आनंद व्यक्त केला. या जाणत्यांची हजेरी स्पर्धकांचाही उत्साह वाढवणारी ठरली. या स्पर्धेत सातत्य हवे, आता ती दरवर्षी व्हावी अशीच इच्छा या रंगकर्मीसह अनेक स्पर्धकांनीही व्यक्त केली. पुढच्या वर्षी अधिक तयारी व ताकदीने उतरू अशीच ईष्र्या त्यात होती.
‘लोकसत्ता-लोकांकिका’च्या निमित्ताने महाविद्यालयाच्या स्तरावर उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. नगरच्या नाटय़चळवळीला त्यामुळे बळकटी मिळू शकेल. प्राथमिक फेरीत शहर व जिल्हय़ातील स्पर्धकांनी काही धाडसी विषय हाताळले, हे या स्पर्धेचे यश आहे. स्पर्धेतून चांगले कलावंत मिळतील.
– संजय आढाव, परीक्षक

पहिल्याच प्रयत्नात या स्पर्धेला चांगले यश आले. स्पर्धेतील नियमांमुळे दर्जेदार विषय स्पर्धकांनी हाताळले. त्यांचे सादरीकरण पाहता भविष्यात स्पर्धेला अधिक बळकटी येईल. कलाकारांनाही दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
– शैलेश मोडक, परीक्षक