लोकसत्ता वार्ताहर

बोईसर: बोईसर पूर्वेकडील खैरापाडा येथे असलेल्या ‘इको इडन्टसिटी’ या ठिकाणी नुकत्याच संपन्न झालेल्या राजकीय नेत्याच्या मुलाचा लग्न सोहळा अडचणीत आला आहे. करोनाकाळातील सामाजिक अंतर व मुखपट्टय़ांच्या नियमांना येथे तिलांजली मिळाली तसेच सार्वजनिक कार्यक्रमांबाबतचा बंदी आदेश येथे निकाली निघाला होता.

पालघर जिल्हाधिकारी यांच्या पथकाने करोनाचे र्निबध उल्लंघन करणाऱ्या लग्न सोहळ्यात धाड टाकून काही मोजक्या लोकांवर कारवाई केली होती. याच वेळी बोईसरमध्ये सत्ताधारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांने नियम धुडकावून आपल्या मुलाचा शाही विवाह सोहळा पार पाडला होता. याबाबत ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातुन लग्न समारंभाबाबत कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी पालघर यांना आदेश देण्यात आले आहेत.

बोईसर पूर्वेकडील खैरापाडा येथे असलेल्या ‘इको इडन्टसिटी’ या ठिकाणी शिवसेनेचे नेत्याच्या मुलाचा शाही थाटात लग्न समारंभ रविवारी आयोजित केला होता. याबाबत लोकसत्ता मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्या नंतर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातुन लग्न सोहळा प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी प्रांत अधिकारी पालघर यांना देण्यात आले आहेत.

या लग्नात ड्रोन कॅमेरानेदेखील चित्रीकरण करण्यात आले असून ड्रोन उडविण्यासाठी बोईसर पोलीस ठाण्यातून परवानगी घेण्यात आली होती का? हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होत आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना कायद्याचा बडगा दाखवून लग्न समारंभ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी तत्परता दाखवणारे जिल्हाधिकारी आता बोईसर मधील शाही सोहळ्यावर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित करत याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते.