शहरातील एकतानगरमध्ये महिलेस बेशुद्ध करून घरातील पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविण्यात आले. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.
अनिता राजकुमार किल्लेदार (वय २२) ही गृहिणी घरी एकटीच होती. त्यांचे पती व सासूबाई काही कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर दोन अनोळखी चोरटे दरवाजात आले. पाहुणे असल्याचा बहाणा करून त्यांनी घरात प्रवेश मिळवला. या प्रकाराने अनिता घाबरल्या. काही कळायच्या आत एकाने अनिताचे तोंड दाबले. तोंड दाबल्यानंतर अनिता यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र,चोरटय़ांनी त्यांचे डोके िभतीवर आदळले. या प्रकाराने त्या बेशुद्ध पडल्या. चोरटय़ांनी घरात सामानाची शोधाशोध केली. जुजबी वस्तू अस्ताव्यस्त फेकून कपाटातील ५४ गॅ्रमचे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. या दागिन्यांची किंमत १ लाख ७७ हजार रुपये आहे.
तासाभराने अनिता यांच्या सासू घरी परतल्या, तेव्हा घरात चोरी झाल्याचे त्यांना कळाले. सून अनिता बेशुद्धावस्थेत असल्याचे नजरेस पडले. तातडीने तोंडावर पाणी मारून अनिताला जागे केले. भरदिवसा घरात घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली. अलीकडे तापमान वाढत चालल्याने रस्ते निर्मनुष्य होत आहेत. कॉलन्यांमध्येही शुकशुकाट जाणवतो. याचाच फायदा घेत चोरटय़ांनी ही चोरी केली. नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.