नगर शहरातील हिडीस विसर्जन मिरवणुकीला माळीवाडय़ातील एका मंडळाचा अपवाद वगळता अन्य गणेश मंडळांनी यंदा देखणे स्वरूप दिले. पारंपरिक वाद्ये हेच आकर्षण ठरलेल्या या मिरवणुकीची सांगता मात्र राजकीय स्पर्धेनेच झाली. इन मीन पंधरा मंडळांच्या मिरवणुकीतील दहाच मंडळांचे विसर्जन निर्धारित वेळेत झाले. उर्वरित पाच मंडळांच्या मिरवणुका वेळेच्या मर्यादेनुसार चितळे रस्त्याच्या अलीकडेच थांबवाव्या लागल्या. शिवसेनेच्या दोन्ही मंडळांनी मिरवणुकीत किळसवाणे डीजे सामील करून देखण्या सोहळ्याला गालबोट लावले.
राजकीय स्पर्धेचा काही वेळचा अपवाद वगळता नगर शहरातील गणपती विसर्जनाची मिरवणूक शांततेत पार पडली. मुळातच सुरू होण्यास झालेला उशीर आणि पुढे रेंगाळत दोन मंडळांमध्ये पडलेले अंतर हे या मिरवणुकीचे वैशिष्टय़ ठरले, मात्र ब-याच वर्षांनी शहरात ढोल-ताशे व पारपरिक वाद्यांचा आवाज जोरदार घुमल्याने ही मिरवणूक कंटाळवाणी ठरली नाही. माळीवाडय़ातील गणेश मंडळांच्या डीजेमुक्तीच्या निर्णयाला नगरकरांनीही कुटुंबासह गर्दी करून जोरदार प्रतिसाद दिला. महिलांसह झालेली ही गर्दी हेही यंदाच्या विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्टय़ ठरले. मागच्या काही वर्षांतील हिडीस प्रदर्शनाला चांगलाच चाप बसल्याने ही मिरवणूक देखणी झाली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या पंधरापैकी तेरा गणेश मंडळांनी डीजेला फाटा देत ढोल-ताशा विविध डाव सादर केले. शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांचे समझोता तररुण मंडळ (माळीवाडा) आणि शिवसेनेचेच दुसरे शितळादेवी मंदिर या दोन मंडळांनी मात्र हिडीस डीजे लावत या देखण्या मिरवणुकीला गालबोट लावण्याचाच प्रयत्न केला.
शहराच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवातच यंदा विलंबाने झाली. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरातील मानाच्या पहिल्या गणपतीच्याच मिरवणुकीला सुमारे तासभर विलंब झाल्याने पुढे अन्य मंडळांच्या मिरवणुकांनाही विलंब झाला. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता श्री विशाल गणपती मंदिरातील उत्सवमूर्तीची पूजा होऊन त्यानंतर हा गणपती विसर्जन मार्गाकडे मार्गस्थ झाला. मात्र मिरवणुकीचे प्रारंभस्थळ रामचंद्र खुंट येथे येण्यासच या गणपतीस विलंब झाला. हा गणपती मिरवणुकीत सहभागी होईपर्यंत अन्य मंडळेही मागे ताटकळली. या गणपतीच्या पुढे प्रथेप्रमाणे सनई-चौघडा, शालेय विद्यार्थ्यांचे लेझीम पथक होते. पारंपरिक रथातून हा गणपती मिरवणुकीत सहभागी झाला. स्वागतासाठी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मार्गावरच आरती व दर्शनासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर यांच्यासह अन्य विश्वस्त मिरवणुकीत सहभागी झाले होते. सुरुवातीला झालेला विलंब वाटेत भरून काढण्याचा प्रयत्न या विश्वस्तांनी केला. मात्र भाविकांच्या गर्दीमुळे यंदा या गणपतीला सुमारे तासभर विलंब झालाच. सायंकाळी सव्वासातच्या सुमारास हा गणपती दिल्ली दरवाजाबाहेर पडला.
मानाच्या पहिल्या गणपतीनंतरच्या माळीवाडय़ातील अन्य बारा, महापौर संग्राम जगताप यांचे प्रेरणा प्रतिष्ठान (जुने बसस्थानक), शिवसेनेचे शितळादेवी मंदिर मंडळा (तोफखाना) आणि आझाद चौक गणेश मंडळ अशी एकूण इन मीन पंधरा सार्वजनिक मंडळे मिरवणुकीत सहभागी झाले होते. माळीवाडय़ातील समझोता व शिवसेनेचे मंडळ या दोघांनी त्यांची डीजेची हौस कायम ठेवली. अन्य तेरा मंडळांनी मात्र पारंपरिक ढोल-ताशांचे डाव सादर करून मिरवणुकीची शोभा चांगलीच वाढवली. त्यातही कपिलेश्वर मंडळाचे सुमारे ८० महिला व पुरुषांचे भजनी मंडळ, चांदा येथील डफाचा डाव, माळीवाडा तरुण मंडळातील रुद्रनाद समूहाचे शंभर ढोल-ताशांचे पथक, आदिनाथ तरुण मंडळाचे कामटी येथील लेझीम पथक, प्रेरणा प्रतिष्ठानमधील तालयोगी समूहाचे शंभर जणांचे ढोल-ताशांचे पथक, आझाद चौक मंडळाचे मावळ येथील ढोल पथक हे मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. यानिमित्ताने नगरकरांना ब-याच वर्षांनी पारंपरिक वाद्यांचे डाव पाहायला मिळावले, त्याने नगरकरही सुखावले. त्यामुळेच बहुधा डीजे लावलेल्या दोन्ही मंडळांसमोर केवळ हिडीस नाचणा-यांचीच गर्दी होती, नगरकरांची पसंती मात्र अन्य तेरा मंडळांनाच मिळाली. कपिलेश्वर मंडळाच्या मिरवणुकीत महिलाही मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. या महिला भजनात तसेच लेझिम नृत्यातही सहभागी झाल्या.
घोषणेबाजी आणि शक्तिप्रदर्शन
मानाच्या पहिल्या गणपतीनंतर अन्य मंडळांच्या मिरवणुकीला विलंब झाला, त्यातच दुपारपासूनच दोन मंडळांत मोठे अंतर पडले. त्यामुळे ही मिरवणूक रेंगाळली. त्यातूनच शिवसेना व राष्ट्रवादी अशा राजकीय स्पर्धेचे जोरदार प्रदर्शन झाले. शिवसेनेच्या मंडळापुढे नेमका महापौर जगताप यांच्या मंडळाचा गणपती होता. या दोन मंडळांमध्ये दुपारपासूनच चढाओढ होती. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही मंडळांभोवती प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त होता. तरीही ही मिरवणूक चांगलीच रेंगाळली. मिरवणुकीसाठी रात्री बाराचे बंधन होते, मात्र रात्री अकरा वाजले तरी, शिवसेनेचा गणपती अर्बन बँकेजवळच होता, त्यावरून वातावरण चांगलेच तापले होते. आमदार अनिल राठोड यांनी स्वत: हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलिसांकडेही त्यांनी तक्रार केली. पुढच्या मंडळातही स्वत: महापौर जगताप हजर होते. पुढे सरकण्यावरून सुरू झालेल्या राजकीय घोषणाबाजीने काही काळ तणावही वाटत होता. पोलिसांनी अखेर महापौरांच्या मंडळाला काहीशा जबरदस्तीनेच पुढे काढले, मात्र रात्री साडेअकरा वाजले तरी शिवसेनेचा गणपती नवा कोप-याजवळच होता. येथे बराच वेळ ताणाताणी झाली, अखेर त्याच दरम्यान जगताप यांनी त्यांच्या मंडळाची मिरवणूक येथेच संपवून ते कार्यकर्त्यांसह निघून गेले, ते पाहून शेवटची पंधरा-वीस मिनिटे आमदार राठोड यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे जिल्हा वाचनालयाच्या चौकात येऊन समझोता मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी झाले, मात्र त्यानंतर काही वेळात बाराच्या वेळमर्यादेमुळे ध्वनिक्षेपक व वाद्ये बंद करावी लागल्याने मिरवणुकीचीच सांगता झाली. समझोता, नीलकमल, शिवशंकर, शिवसेना व आझाद चौक या मंडळांच्या मिरवणुका येथेच संपवण्यात आल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम हे स्वत: मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते.
पोलिसांबद्दल नाराजी
पोलिसांचे नियोजनच शिवसेना-राष्ट्रवादीच्या रोषाचे कारण बनले. विसर्जन मिरवणुकीत दुपारपासूनच दोन मंडळांत मोठे अंतर पडले होते. मात्र त्याकडे दिवसभर दुर्लक्ष करून पोलिसांनी मिरवणूक संपण्यास अर्धा-पाऊण तास राहिला असताना हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्याचा उपयोगच नव्हता, याबद्दलच आमदार राठोड यांनी तीव्र शब्द नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी वेळीच लक्ष घातले असते तरी ही वेळच आली नसती.
सावेडीत डीजेचा दणदणाट
गेल्या सहा वर्षांपासून सावेडीत उपनगरातील मंडळांची स्वतंत्र मिरवणूक निघते. यंदा या मिरवणुकीत तब्बल ७० मंडळे सहभागी झाली होती, मात्र त्यात डीजेचाच दणदणाट होता. दुपारी सुरू झालेली ही मिरवणूक शांततेत रात्री ११ वाजता संपली.