४०० हून अधिक बागायतदार आर्थिक संकटात; लग्नसराई, यात्रा, उत्सव रद्द झाल्याने मागणीत घट

नितीन बोंबाडे, लोकसत्ता

डहाणू : करोना महासाथीमुळे राज्यभर लागू असलेल्या टाळेबंदीमुळे झेंडू बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत. लग्नसराई, यात्रा उत्सव, मंडईत मागणी नसल्याने ४०० हून अधिक झेंडू बागायतदारांच्या बागा वाया गेल्या आहेत. एप्रिल, मे महिन्यात उत्पन्न मिळवून देणाऱ्या सण उत्सवांसाठी लाखो रुपये खर्च करून फुलवलेल्या झेंडू फुलबागा छाटणी करून बांधावर फेकून देण्याची वेळ डहाणू, वाडा, पालघर, विक्रमगड येथील शेतकऱ्यांवर आली आहे.

डहाणू तालुक्यात बोर्डी, वाणगाव, चिंचणी, ओसार, वाढवण, वरोर, आसनगाव, देदाळे, चंद्रनगर, निकणे, रानशेत यासह पालघर, विक्रमगड, तलासरी या तालुक्यांतही मोठय़ा प्रमाणात विक्रमी झेंडूच्या बागांची लागवड होते. जवळपास ४०० हून अधिक लहान मोठय़ा बागातदारांमधून अंदाजे ३०० हेक्टर वर झेंडू बागा लागवडीखाली लावल्या जातात. करोनामुळे झेंडू बागांतून मोठय़ा  बागायतदाराला १० ते १२ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

एप्रिल,मे महिन्यात सणासुदीमध्ये चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी बागायतदार पारंपरिक शेतीकडून व्यापारी शेतीकडे वळू लागले आहेत. डहाणूत चिकू, मोगरा, झेंडू, मिरची, केळी यांसह विक्रमी उत्पन्न काढतात. यासाठी फुलांच्या विक्रीमधून चांगले उत्पन्न पदरात पडेल या आशेने दररोज शेतमजुरासह  संपूर्ण कुटुंबासह बागकामात गुंतून घेतात. बियाणासह खत, कीटकनाशक, पाणी, मजुरी यावर मोठा खर्च झेलून आशेने राबली. मेहनतीला मोल येऊन या वर्षीही फुलबागा मागणी इतक्या फुलल्या. मात्र ऐन सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारच्या टाळेबंदीमुळे बाजारपेठा ठप्प झाल्याने फुलांची खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

‘कलकत्ता रेड’ (अष्टगंधा ), पिवळ्या रंगाचे ‘अ‍ॅरोगोल्ड’ या झेंडूच्या फुलांना बाजारात चांगली मागणी आहे. कलकत्ता रेडला जास्त दर मिळतो तर पिवळी मोठय़ा आकाराची फुले अधिक आकर्षक दिसतात. लग्नसराई, गुढीपाडवा, यात्रा, जत्रा उत्सवाला मागणी लक्षात घेऊन बोर्डी, वाणगाव, केळवे, पालघर, सफाळे, वाडा, विक्रमगड आणि परिसरात जवळपास लहान मोठे ४०० शेतकरी झेंडूची लागवड करतात. शेताच्या बांधावर झेंडूची लागवड करुन लहान शेतकरी सणासुदीला झेंडूची फुले विक्री करून पैसे कमवताना दिसतात.

मी ४० एकरामध्ये झेंडूची बाग लावतो. त्याला १० ते १२ लाखांचा खर्च आला आहे. गुढीपाडव्यासाठी ३० ते ४० टन फुले तयार होती परंतु मार्केट बंद असल्यामुळे सर्व पीक वाया गेले आहे.

– कल्पेश दत्तू पाटील,  कासा