22 September 2020

News Flash

तीन महिन्यांत तब्बल २८४ कोटींच्या महसुलावर ‘पाणी’!

राज्यातील ९ सीमा तपासणी नाक्यांवरून जाणाऱ्या ओव्हरलोड गाडय़ांकडे ‘आरटीओं’ नी ‘अर्थ’ पूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे मागील ३ महिन्यात राज्य सरकारची तब्बल २८४ कोटींची महसूलहानी झाली.

| August 28, 2014 01:30 am

राज्यातील ९ सीमा तपासणी नाक्यांवरून जाणाऱ्या ओव्हरलोड गाडय़ांकडे ‘आरटीओं’ नी ‘अर्थ’ पूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे मागील ३ महिन्यात राज्य सरकारची तब्बल २८४ कोटींची महसूलहानी झाली. परिवहन आयुक्तांनी दिलेल्या गोपनीय पत्रावरून ही खळबळजनक बाब समोर आली.
राज्यातील ९ सीमा तपासणी नाक्यांना संगणकीकृत करण्यात आले आहे. त्यामुळे तेथून जाणाऱ्या गाडय़ांच्या वजनाची नाक्यावर आपोआप नोंद होते. साहजिकच मागील ३ महिन्यात अच्छाड, मंद्रुप, नवापूर, हदखेडा, रामटेक, उमरगा, सावनेर, वरुड व िपपळखुट्टी या सीमा तपासणी नाक्यांवर झालेल्या घोटाळ्याची आकडेवारी राज्य सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. या बाबत मुंबईच्या निरीक्षण विभागाच्या परिवहन आयुक्तांनी नुकतेच गोपनीय पत्र सादर केले. त्यात म्हटल्यानुसार ३ महिन्यात ९ सीमा तपासणी नाक्यांवरून २ टन, ३ टन व ५ टन असा अतिरिक्त माल वाहून नेणाऱ्या ५३ हजार ७७१ गाडय़ा बिनबोभाट सोडण्यात आल्या. परंतु  संगणकीकृत यंत्रणेमुळे या गाडय़ांची नाक्यांवर नोंद झाली. त्यामुळे या गाडय़ा सोडण्यासाठी ‘आरटीओ’ व त्यांनी पाळलेल्या दलालांनी लाटलेले ‘वजन’ समोर आले आहे!
बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर २००८ मध्ये २२ सीमा तपासणी व ८ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नाके उभारण्याचे ठरले होते. त्यासाठी १ हजार कोटींचा खर्च अपेक्षित होता. २२ पकी ९ नाके पूर्ण झाले. हे नाके सद्भाव महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट या कंपनीला २४ वर्षे ६ महिन्यांसाठी देण्यात आले. नाक्यावर मालाचे वजन करणे, डाटा एन्ट्री, स्कॅिनग, माल चढ-उतार, वाहनतळ उभारणी आदी कामे या सेवा पुरवठादार कंपनीला देण्यात आली आहेत. मात्र, आरटीओच्या ‘अर्थ’ पूर्ण संबंधांमुळे या सेवा पुरवठादारांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. मे, जून व जुल या ३ महिन्यांत कंपनीचे ७३ कोटी १६ लाख रुपयांचे नुकसान झाल्यामुळे भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली. हा घोटाळा असाच सुरू राहणार असेल, तर राज्य सरकारने कंपनीला वर्षांचे २९२ कोटी नुकसान भरपाईपोटी द्यावेत, असेही कंपनीने म्हटले आहे.
या बाबत निरीक्षण विभागाच्या परिवहन उपायुक्तांनी दिलेल्या गोपनीय पत्रात सेवा पुरवठादाराने दिलेल्या माहितीत तथ्य असल्याचे नमूद केले आहे. मागील तीन महिन्यांत २८३ कोटी ८४ लाख एवढी महसूलहानी सेवा पुरवठादाराने मांडलेल्या गृहितकावरून दिसून येत असल्याचे त्यांनी मान्य केले. या बाबत सीमा तपासणी नाक्याचे नियंत्रण अधिकारी म्हणून तातडीने उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.
दलालांचा विळखा!
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील उमरगा येथील तपासणी नाक्यावर क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणाऱ्या एका गाडीच्या चालकाला या बाबत विचारणा केली असता, आरटीओने पाळलेल्या दलालांना ४०० रुपये दिल्यास कोणीच थांबवत नसल्याचे त्याने सांगितले. आंध्र प्रदेशातून गुजरातकडे निघालेल्या मस्तान रंगा नावाच्या चालकाने केवळ २०० रुपयांत हा मामला गुंडाळला जात असल्याची माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2014 1:30 am

Web Title: loss of revenue in actroi
टॅग Loss,Osmanabad,Revenue
Next Stories
1 जेसीबीने काम, मस्टरवर नावे!
2 भाजपचा आता ‘मॉर्निग वॉक’वर भर!
3 दहा हजारांची लाच घेताना सरपंचासह तिघे जाळ्यात
Just Now!
X