महानगरपालिकेने अखेर घरपट्टीवरील शास्तीत सूट देऊन नगरकरांना नव्या वर्षांची भेट दिली आहे. मात्र त्यासाठी काही अटीही घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार शास्तीत थेट ७५ टक्के व १०० टक्के सूट देण्यात आली आहे.
महापौर तथा आमदार संग्राम जगताप यांनी नववर्षदिनी गुरुवारी मनपाचे आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याशी चर्चा केल्यानंतर शास्तीमाफीचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळीच आयुक्तांनी तसा आदेशही पारित केला. या बैठकीस उपमहापौर सुवर्णा कोतकर, स्थायी समितीचे सभापती किशोर डागवाले, सभागृह नेता कुमार वाकळे आदी उपस्थित होते.
या निर्णयानुसार जे घरमालक दि. ३१ मार्च १४ पर्यंतची थकबाकीची संपूर्ण रक्कम व त्यावरील २५ टक्के शास्तीची रक्कम भरतील त्यांना शास्तीत ७५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. चालू म्हणजेच सन २०१४-१५ या वर्षांची घरपट्टीची रक्कम ज्यांनी वर्षांखेर म्हणजे बुधवापर्यंत भरली नसेल, अशा घरमालकांनी त्यांची घरपट्टी एकरकमी भरल्यास त्यांना शास्तीमध्ये १०० टक्के सवलत मिळणार आहे. त्यासाठी घरमालकांना येत्या दि. ३१ पर्यंत त्यांच्याकडील सर्व देय रक्कम भरावी लागेल.
कुलकर्णी यांनी सांगितले, की मनपाची शहरात घरपट्टी व पाणीपट्टीची तब्बल १२० कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदारांना नोटिसा पाठवून जप्तीची मोहीम मनपाने हाती घेतली होती. मात्र घरपट्टीच्या शास्तीत घसघशीत सवलत दिल्यास ही वसुली वाढेल, असा अंदाज असून ते लक्षात घेऊनच घरपट्टीच्या शास्तीत सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने वसुली वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्याही सूचना कुलकर्णी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याबाबत त्यांच्याकडून वसुलीवाढीचे प्रस्तावही मागवण्यात आले होते.
मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील सूची ड मधील प्रकरण अकरान्वये मनपा आयुक्तांना असलेल्या अधिकारांचा वापर करून ही सवलत देण्यात आली आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घेऊन अधिकाधिक करभरणा करावा, असे आवाहन जगताप यांनी या आदेशानंतर केले आहे.