15 August 2020

News Flash

यवतमाळ जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता

शिवसेनेच्या कालिंदा पवार अध्यक्षपदी, राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्षपद

वनमंत्री संजय राठोड यांच्यासह जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष कालिंदा पवार

शिवसेनेच्या कालिंदा पवार अध्यक्षपदी, राष्ट्रवादी काँग्रेसला उपाध्यक्षपद

यवतमाळ : जिल्हा परिषदेत आज सोमवारी झालेली अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होऊन महाविकास आघाडीची सत्ता आली. अध्यक्षपदी शिवसेनेच्या कालिंदा यशवंत पवार यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रांती ऊर्फ बाळासाहेब कामारकर यांची निवड  झाली. जिल्ह्याच्या इतिहासात शिवसेनेच्या वाटय़ाला पहिल्यांदाच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आले आहे.

अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी नामांकन दाखल करायच्या वेळेपर्यंत शिवसेनेच्या कालिंदा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रांती कामारकर यांचेच अर्ज प्राप्त झाले. १८ सदस्य असूनही भाजपच्या वतीने दोन्ही पदांसाठी कोणीही नामांकन दाखल केले नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले होते. मात्र आज सकाळपासून भापजने महाविकास आघाडीतील काही सदस्यांना सोबत घेऊन सत्तेत सहभागी होता येईल का, याची अखेपर्यंत चाचपणी केली. सकाळी भाजपच्या सदस्यांची बैठकही घेण्यात आली. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाविकास आघाडीची एकजूट असल्याने भाजपचे मनसुबे फळास आले नाहीत. अध्यक्षपदासाठी अपेक्षित संख्याबळच नसल्याने भाजपने या निवडणुकीतूनच माघार घेतली. त्यामुळे दुपारी ३ वाजता झालेल्या निवडसभेत अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

कालिंदा पवार या पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील दारव्हा तालुक्यातून लोही सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांच्याकडे सध्या शिक्षण सभापतीपद होते. पालकमंत्री तथा वनमंत्री संजय राठोड यांनी तीन वर्षांपूर्वी अध्यक्षपदाची कालिंदा पवार यांची हुकलेली संधी अखेर त्यांना मिळवून दिली. या निमित्ताने शिवसेनेने मराठा समाजाला प्रतिनिधित्व दिले, असा संदेशही दिला. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कालिंदा पवार यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. उपाध्यक्षपद पुसद मतदारसंघास मिळाले. क्रांती कामारकर यांच्या रूपाने उपाध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री मनोहर नाईक व आमदार इंद्रनील नाईक यांचे वर्चस्व राहिल्याची चर्चा जिल्हा परिषदेत आहे. काँग्रेसला दोन सभापतीपद देण्यात येणार असून अन्य दोन सभापतीपदांवर शिवसेनेने दावा सांगितला आहे.

तीन वर्षांनंतर शिवसेनेची प्रतीक्षा संपली!

यवतमाळ जिल्हा परिषदेत सर्वाधिक २० सदस्य असूनही २०१७ मध्ये शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेनेची युती झाल्यानंतर येथे जिल्हा परिषदेत भाजपने शिवसेनेला सोबत घेत राष्ट्रवादीशी काडीमोड घेतला होता. मात्र त्यावेळी शिवसेनेला दोन सभापतीपदांवर समाधान मानावे लागले. राज्यातील नवीन राजकीय समीकरणामुळे तिन्ही पक्षांनी एकत्र येत भाजपला सत्तेबाहेर ठेवले. जिल्हा परिषदेत शिवसेना २०, भाजप १८, एका अपक्षासह काँग्रेसचे १२ व राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ असे संख्याबळ आहे. सत्तेत सहभागी होण्यासाठी तीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शिवसेनेला अखेर महाविकास आघाडीमुळे ‘मिनी मंत्रालया’ची सत्ता बिनविरोध प्राप्त झाली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 2:03 am

Web Title: maha vikas aghadi won yavatmal zilla parishad poll zws 70
Next Stories
1 तारापूर असुरक्षितच
2 विदर्भातील साखर उत्पादन नाममात्र, केवळ एक टक्के वाटा
3 नंदीध्वजांच्या मिरवणुकांद्वारे सिध्देश्वर यात्रेला प्रारंभ
Just Now!
X