महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड गावच्या हद्दीतील एक बंगला भाड्याने दिल्या प्रकरणी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून बंगल्यावर लग्नाची पार्टी झाली असून रात्री पोलिसांनी या ठिकाणी जावून पंचनामा करण्यात आला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड गावामध्ये एका फार्म हाऊसवर करोनासंदर्भातील निर्बंधांचे उल्लंघन करुन पार्टी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावाच्या हद्दीतील एक बंगला भाड्याने देणाऱ्या मालकाविरुद्ध तसेच लग्नाची पार्टी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी या ठिकाणी रात्री पंचनामा करुन गुन्हा दाखल केलाय.

भिलारपासून जवळच असणाऱ्या कासवंड गावच्या हद्दीतील हमीद हाऊस हा बंगला मालक सागर तराळ यांनी संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश लागू असताना काही धनाढ्यांच्या भाड्याने राहण्यास दिला. कोरोना साथीच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न करता गर्दी जमवल्याप्रकरणी तराळ यांच्याविरोधात पांचगणी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस फौजदार अरविंद श्रीरंग माने यांनी गुन्हा दाखल केला आहे.

शासनाने लागू केलेले लॉकडाउनचे कडक नियम लागू केलेले असतानाही हमिदा हाऊस या बंगल्यामध्ये रोज शेकडो लोक बाहेरून येवून राजरोसपणे या ठिकाणी लग्नाची पार्टी करत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. काही ग्रामस्थांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार चालू असताना काही ग्रामस्थ या ठिकाणी धडकले.

जमाव बंदी व जिल्हा बंदी असताना शासनाचे आदेश धुडकावत हे लोक या ठिकाणी आलेच कसे हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. प्रशासनाचा कडक लॉकडाउन असताना बाहेरून या ठिकाणी आलेल्या लोकांमुळे कोरोना प्रसार होऊ शकतो अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली. या पार्टीत कुणाच्याही तोंडावर मास्क नव्हता असे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. बाहेरून आलेले धनदांडगे पार्टी करताना आढळून आले. लोकांच्या आरोग्याच्या चिंतेला वाटाण्याच्या अक्षता वाहात असे गैरप्रकार होत असुन संबधितांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

अनेक गावांनी करोना प्रदुर्भाव रोखण्यासाठी गावबंदी केली आहे. गावांच्या सीमा बंद करीत आहेत गावात बाहेरून कुणालाही प्रवेश नाही बंदी आहे असे असताना मुंबई-पुण्याहून हे लोक आलेच कसे, कुणाच्या परवानगी आले अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पाचगणीचे सपोनि सतिश पवार व त्यांचे सहकारी करीत आहेत.