रायगड जिल्ह्यातील महाड शहरात तारीक पॅलेस ही पाच मजली निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. तारीक पॅलेस इमारत दुर्घटनेत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. तर सात जखमींवर महाड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही 18 ते 19 जण दबले असल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या इमारत दुर्घटनेप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरसह तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, नगरपालिका इंजिनिअर आणि Rcc कन्सल्टन्स अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिल्डर फारूक काझी याच्यासह आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे , वास्तुविशारद गौरव शहा, तत्कालीन मुख्याधिकारी दीपक जिंदाड , अभियंता शशिकांत दिघे यांच्याविरोधात गुन्हा झाला आहे. साधारणपणे पाच वर्षांपूर्वी या इमारतीचं बांधकाम झालं होतं अशी माहिती आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही इमारत हेलकावे खात असल्याची तक्रार रहिवाशांनी विकासकाकडे केली होती. मात्र, या तक्रारींकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे समजत आहे. इमारतीमध्ये 45 फ्लॅट होते. ज्यापैकी 18 फ्लॅट रिकामे होते. इमारतीच्या ए विंग मध्ये 30 जण दुर्घटनेची चाहूल लागताचय इमारतीतून बाहेर पडले. ८ जण बेपत्ता आहेत. तर बि विंग मध्ये 60 लोक राहत होते. यापैकी 51 जण बाहेर पडले. तर 9 जण बेपत्ता आहेत. व दोन इतर असे एकुण 18 ते 19 जण बेपत्ता असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ढिगारा उपसण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. रात्री एक वाजताच्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तीन पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी लगेचच मदत व बचाव कार्य सुरु केले. पहाटे पर्यंत वरच्या दोन मजल्यांचा ढिगारा उपसण्यात आला आहे.
इमारतीच्या ढिगाऱ्यातून आतापर्यंत 8 जणांना बाहेर काढण्यात आले. यातील एकाचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत सात जणांवर उपचार सुरु आहेत. घटनास्थळावरील मदत व बचावकार्याची रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाणी केली आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर घटना स्थळावर उपस्थित आहेत. बांधकाम व्यवसायिकावर चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 25, 2020 12:20 pm