19 June 2019

News Flash

महालक्ष्मी एक्स्प्रेसचे नाव खोडून ‘अंबाबाई एक्स्प्रेस’, शिवसेनेचे कोल्हापुरात आंदोलन

अचानक झालेल्या आंदोलनामुळे प्रवाशांची त्रेधा

कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिराचा वाद आता एक्स्प्रेसपर्यंत जाऊन पोहचला आहे. कारण श्रीपूजकांना झालेली मारहाण ताजी असतानाच आता शिवसेना आणि कृती समितीने ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’चे नाव बदलून ‘अंबाबाई एक्स्प्रेस’ ठेवण्यासाठी आंदोलन केले. आज संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास शिवसैनिकांनी छत्रपती शाहू महाराज स्थानकात आंदोलन करत महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या इंजिनापासून ते शेवटच्या डब्यापर्यंत ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’ ही अक्षरे काढून टाकत, त्या ठिकाणी ‘अंबाबाई एक्स्प्रेस’ नावाचे स्टिकर्स लावले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे प्रवाशांचीही चांगलीच त्रेधा उडाली.

करवीर निवासीनी महालक्ष्मी मंदिरातील श्री पूजक हटाओ आणि महालक्ष्मी ऐवजी अंबाबाई नावाचा उल्लेख करावा यासाठी आंदोलन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमाराला शिवसेनेच्या वतीने महालक्ष्मी एक्स्प्रेसवरील महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या ऐवजी अंबाबाई एक्स्प्रेस नावाचे स्टिकर लावण्यात आले. एक्स्प्रेसच्या इंजिनापासून ते शेवटच्या डब्यापर्यंत जिथे जिथे महालक्ष्मी एक्स्प्रेस असा उल्लेख होता त्याच ठिकाणी, अंबाबाई एक्स्प्रेस नावाचे स्टिकर्स लावण्यात आले. यावेळी ‘अंबामाताकी जय!’ ‘अंबाबाईच्या नावाने चांगभलं’, ‘शाहू महाराजांचा विजय असो’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरच्या महालक्ष्मीला साडीऐवजी, घागरा-चोळी नेसवल्याने चांगलाच वाद निर्माण झाला होता. तसेच दोनच दिवसांपूर्वी श्रीपूजक ठाणेकर यांना मारहाण करण्यात आली होती. अजित ठाणेकर यांनी महालक्ष्मीला घागरा चोळी नेसवल्याबद्दल आत्मक्लेश करावा अशी मागणी होत होती. त्याचवेळी वाद झाला आणि नंतर अजित ठाणेकर यांना मारहाणही करण्यात आली.

आता याच महालक्ष्मी मंदिराचा वाद थेट रेल्वेपर्यंत येऊन पोहचल्याचे चित्रही आज बघायला मिळाले. कोल्हापूरची महालक्ष्मी ही अंबाबाई आहे त्यामुळे तिला अंबाबाईच म्हटले गेले पाहिजे अशी आग्रही भूमिका शिवसेना आणि कृती समितीने घेतली आहे. आज याच मागणीसाठी शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी सरकारने लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर आंदोलन अधिक तीव्र होईल असाही इशारा यावेळी देण्यात आला आहे.

First Published on June 25, 2017 9:45 pm

Web Title: mahalaxmi express named ambabai express shivsenas agitation