मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, शुक्रावारी राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १२ वाजता पंतप्रधान मोदींना भेटतील तर सायंकाळी ६ वाजता सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.

महाविकास आघीडीतील समन्वय राखण्याासाठी उद्धव ठाकरे सोनिया गांधीची भेट घेणार असल्याचे बोललं जातेय. गेल्या काही दिवासांपासून महाआडीत बिघाडी झाल्याच्या चर्चेला उधान आलं होतं. त्यातच दोन दिवसांपूर्वी राज्यातील काँग्रेसचे प्रमुख आमदार सोनिया गांधींना भेटण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे सोनिया गांधीना भेटण्यासाठी जाणार असल्यामुळे आघीडीत खरंच बिघाडी झाली का? याबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे आंनी दिल्लीत जाऊन सोनिया गांधींची भेट घेत त्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते.

दिल्ली दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार आहेत. या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये, ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी शुक्रवारी दुसऱ्यांदा भेट होणार आहे. याआधी पंतप्रधान महाराष्ट्रात आले असताना ठाकरे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली होती.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून केंद्र सरकारने शहरातील पायाभूत सुविधा विकासासाठी विशेष आर्थिक मदत द्यावी, यासह राज्याला काही बाबींमध्ये आर्थिक मदत करण्याची विनंती मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधानांकडे करणार आहेत. राज्यातील महत्वाचे प्रश्न आणि आर्थिक मदतीविषयी या भेटीत चर्चा होईल, अशी माहिती शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी ‘ लोकसत्ता ‘ ला दिली.

वस्तू व सेवा कर (जीएसटी) अनुदान, केंद्र-राज्य योजनांमध्ये केंद्राचा हिस्सा यापोटीचा निधी थकित आहे. ही रक्कम लवकरात लवकर मिळावी,यासह काही मुद्दय़ांवर चर्चा अपेक्षित आहे. मुख्यमंत्री या नात्याने ही भेट असून त्यात राजकीय चर्चा होणार नसल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले.