महाराष्ट्र विधानसभेत उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आपलं बहुमत सिद्ध केल्यानंतर रविवारी विधानसभा अध्यक्ष आणि विरोधीपक्ष नेते पदाची निवड करण्यात आली. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केलेल्या विनंतीनंतर भाजपाने आपले उमेदवार किसन कथोरे यांचा अर्ज मागे घेतला. काँग्रेसचे नाना पटोले यांनी अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली.

विरोधी पक्ष नेत्यांचं अभिनंदन करत असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला . ” देवेंद्र फडणवीस हे सध्या विरोधीपक्ष नेते असले तरीही ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांची आणि माझी मैत्री मी कधीही लपवली नाही. विरोधी नेते ही संकल्पना मला पटतच नाही. गेली २५-३० वर्ष ज्यांच्याशी आम्ही भांडत होतो ते आता माझे मित्र आहेत आणि ज्यांच्यासोबत आम्ही होतो ते आता दुसऱ्या बाजूला आहेत. माझ्या दृष्टीने विरोधी पक्षच अस्तित्वात राहणार नाही कारण फडणवीसांसह सर्वच माझे मित्र आहेत”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला.

देवेंद्र फडणवीसांना मी विरोधी पक्षनेता म्हणणार नाही. या सरकारच्या एका महत्वाच्या पक्षाचे आपण नेते आहेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरेंनी केलेल्या अभिनंदनानंतर सर्व पक्षांच्या नेत्यांनी फडणवीसांचं अभिनंदन केलं.