प्रत्येक मतदारसंघाच्या सद्य:स्थितीचा अहवाल काँग्रेस पक्षाकडे आला आहे. तो पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना सादर केला जाईल आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडीबाबतची चर्चा केली जाईल. ही प्रक्रिया साधारण महिनाभरात पूर्ण केली जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. भारिप बहुजन महासंघाबरोबर काँग्रेसची आघाडी व्हावी, असा आमचा मानस आहे. प्रकाश आंबेडकर यांना काय वाटते हे अजून कळू शकले नाही, असेही ते म्हणाले.

काँग्रेसची शिबिरे राज्यभर सुरू आहे. यानंतर ज्या मतदारसंघात अधिक लक्ष देण्याची गरज आहे असे वाटते तेथे पुन्हा सभा घेतल्या जातील. पावसाळ्यानंतर ही प्रक्रियाही सुरू होईल. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष कर्नाटक निवडणुकीत व्यस्त आहेत. त्यांना अहवाल सादर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी आघाडीबाबतची दुसरी बैठक होईल, असे सांगत काँग्रेसही आता बूथ बांधणीच्या कामाला सुरुवात करेल, असे ते म्हणाले.

भाजपकडून युतीसाठी शिवसेनेला कुरवाळणे सुरू झाले आहे. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना अशी राजकीय गणिते जुळून येऊ शकतात काय, या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर देताना चव्हाण म्हणाले की, आमचे वैचारिक मतभेद आहेत. ते जात, हिंदुत्व असा अजेंडा पुढे करतात. आम्ही विकास आणि सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या वैचारिकतेवर काम करतो. त्यांच्याशी हातमिळवणी शक्य नाही. हीच बाब मनसेबाबतही लागू असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या स्थापना दिवसाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी केलेली टीका अशोभनीय असल्याचे सांगत, ‘आम्हीही सत्तेत होतो. परंतु अशी भाषा कधी वापरली नाही. साप, मुंगूस, कुत्रे असे म्हणणे म्हणजे त्यांची वैचारिक पातळी किती खाली घसरली आहे, हे त्यावरून कळते. आम्ही अशा भाषेत कधी बोललो नाही. हा अमर्याद सत्तेचा परिणाम आहे.’

राज्य सरकारचा कारभार केंद्राच्या पॅटर्नप्रमाणे सुरू आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांना काम करू द्यायचे नाही, अशी त्यांची पद्धत आहे. शिवसेनाही लाचार आहे. त्यांना सत्ता सोडवत नाही. कोणीतरी चहाला आले, मुनगंटीवार जेवायला गेले तरी ते शांत होतात. पण काही झाले तरी त्यांची युती होईल, असेच वाटते, असेही चव्हाण म्हणाले. सामाजिक एकोपा राखण्याच्या अनुषंगाने येत्या ९ एप्रिल रोजी सर्व ठिकाणी उपोषण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुखी छत्रपतींचे नाव, हृदयात छिंदम

एकगठ्ठा मते व्हावीत म्हणून मुखी छत्रपतींचे नाव घेतले जाते. मात्र, त्यांच्या हृदयात छिंदम आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेली टीका ही अशोभनीय तर आहेच. पण त्यांचे मानसिक संतुलन ढळल्याचेही दिसत असल्याचे लक्षात येते, असे प्रत्युत्तर चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

पैसे वाटून माणसे फोडली

वैजापूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला उमेदवारही मिळाला नाही. यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटून कार्यकर्ते फोडले. त्यामुळे वैजापूरमध्ये काँग्रेसला उमेदवार देता आला नाही. सर्वत्र आपल्याच पक्षाची माणसे असावीत म्हणून ते कोणत्याही पद्धतीने वागत आहेत. वैजापुरात तर मुख्यमंत्र्यांनीच पैसे पुरविल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.