विदर्भ व मराठवाडय़ाच्या पाठोपाठ आता मध्य महाराष्ट्रातही उकाडय़ाच्या झळा तीव्र बनल्या असून, मंगळवारी सर्वच ठिकाणी कमाल तापमान २ ते ४.५ अंश सेल्सियसनी वाढ नोंदवण्यात आली. थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर (३४.८) तसेच, पुणे (४१.३ अंश), नाशिक (४०.५), सातारा (४२.२), सांगली (४२.३), जळगाव (४४.९) अशा अनेक ठिकाणी मंगळवारी कमाल तापमानाने या हंगामातील उच्चांक गाठला.  राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून उकाडय़ाची तीव्रता वाढली आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमान ४४ ते ४६ अंशांच्या दरम्यान आहे. मराठवाडय़ातही औरंगाबाद (४१.९ अंश), परभणी (४३.६) येथे उकाडा वाढला आहे. आता मध्य महाराष्ट्रात त्याची तीव्रता कमालीची वाढली आहे. काहीसा दिलासा म्हणजे या भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण व वारा सुटत आहे. मंगळवारी सोलापूर येथे दुपारनंतर वादळी पावसाच्या सरी पडल्या. पुणे वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार, वायव्येकडून येणारे उष्ण वारे व दुपापर्यंत निरभ्र राहणारे आकाश यांचा परिणाम म्हणून ही स्थिती उद्भवली आहे. पुढील काही दिवस असेच वातावरण अपेक्षित आहे.राज्यात इतरत्र नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : कोल्हापूर ४०.३, सोलापूर ४२.२, अकोला ४५, अमरावती ४५.४, ब्रह्मपुरी ४४.३, चंद्रपूर ४५.४, गोंदिया ४२.१, नागपूर ४५.४, वर्धा ४४.५.