वाई येथील एका बोगस डॉक्टरने दिलेल्या कबुली जबाबाने सध्या खळबळ माजली आहे. अंगणवाडी सेविका संघटनेच्या राज्य अध्यक्षा मंगल जेधे खून प्रकरणातील आरोपी बोगस डॉक्टर संतोष पोळ याने पोलीस कोठडीतील चौकशीत आणखी पाच खून केल्याचे कबूल केले आहे. त्यातील चार मृतदेह त्याने पोलिसांना काढून दिले. तर एक मृतदेह धोम कॅनाल मध्ये पाण्यात टाकल्याचे पोलिसांना सांगितले. यातील पाच मृतदेह हे महीलांचे व एक पुरुषाचा आहे. सोनं, पैसे आणि अनैतिक संबंधातून हे खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, मंगल जेधे ही मागील तीन महीन्यापासून बेपत्ता होती तिचा तपास करताना साखळी खून प्रकरण उघडकीस आले. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे . यातील चार मृतदेह फार्म हाऊस मध्ये धोम गावातील घराच्या बाजूला पुरले होते. याप्रकरणी आजून तपास सुरू आहे. सन २००३ पासून हा प्रकार सुरू आहे.
संतोष पोळने तीन मृतदेह (एकूण चार) त्याच्या धोम येथील फार्म हाऊस मधून तर एक त्याच्या धोम येथील घराच्या पाठीमागून पुरलेली ठिकाणे पोलिसांना दाखविली. पोलिसांनी जेसीबी मशीन आणि वाई पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले.
घटनास्थळी पोलीस अधिक्षक संदीप पाटील ,सहअधिक्षक विजय पवार, उपअधिक्षक खंडेराव भरणे , दिपक हुंबरे ,पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सपोनि तृप्ती सोनावणे, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार अतुल महेत्रे ,पोलीस उपनिरीक्षक शिरीष शिंदे आदी उपस्थित होते.