खते, बी-बियाणे उत्पादक कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठी राज्यात मोठा पाऊस पडेल असा खोटा अंदाज वर्तवण्यात येत असल्याची तक्रार एका शेतकऱ्याने हवामान विभागाविरोधात पोलिसांत केली आहे. हवामान विभागाच्या अंदाजावर शेतकरी बी-बियाणे आणि खते खरेदी करतो. पण पावसाअभावी शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान होते, असे तक्रारीत म्हटले आहे. माणिक कदम असे तक्रार दाखल केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून परभणी ग्रामीण पोलिसांत त्यांनी ही तक्रार नोंदवली आहे. दरम्यान, याबाबत हवामान विभागाची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही.

कदम हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठावाडा विभागाचे अध्यक्ष आहेत. खोटा अंदाज वर्तवल्यामुळे हवामान विभागाच्या संचालकांविरोधात ४२० चा फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, परभणी ग्रामीण पोलिसांनी हा अर्ज स्वीकारला असून चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकरी आपल्या पीकपाण्याचे नियोजन करतो. मात्र, त्यानुसार पाऊस होत नसल्याने नियोजन कोलमडते.

मागील वर्षी जून महिन्यातही बीड येथील एका शेतकऱ्याने हवामान विभागाविरोधात पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. गंगाभीषण थावरे असे या शेतकऱ्याचे नाव होते. हवामान विभाग चुकीचा अंदाज वर्तवून शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचे थावरे यांनी म्हटले होते.

पुणे वेधशाळा आणि कुलाबा वेधशाळेने पावसाबद्दलचे खोटे अंदाज व्यक्त करून माझे आणि राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान केले. हा फसवणुकीचा प्रकार आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या विरोधात माझी फिर्याद दाखल करून घेत गुन्हा नोंदवावा अशी विनंती करणारा तक्रार अर्ज थावरे यांनी दिला होता.