विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दावा

अमरावती : देशात सर्वात जास्त लसीकरण हे महाराष्ट्राने केले आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीच सांगितले आहे. केंद्र सरकारने मोठय़ा प्रमाणात लस उपलब्ध करून दिल्यानेच हे साध्य करता आले, असा दावा भाजपचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी अमरावतीच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी शहरातील कोविड रुग्णालयाला भेट दिली, त्यांनतर विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी अमरावती जिल्ह्य़ातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी लसीकरणाच्या मुद्यावर आपली भूमिका मांडली.

पुण्यातील सीरम संस्था करोना प्रतिबंधात्मक लस तयार करत आहे. पण लस बनवण्यासाठी कच्चा माल हा अमेरिकेतून येत होता मात्र तो अचानक बंद झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलणी के ल्यानंतर आता अमेरिका कच्चा माल पाठवत आहे. त्यामुळे लवकरच उत्पादन मोठय़ा प्रमाणात वाढेल, असे  फडणवीस म्हणाले.

लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्य़ांना लसीचा साठा पुरवण्यात यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करणार आहोत. केंद्राकडून महाराष्ट्राला लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. दरम्यान, १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांना खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण करावे लागेल, असा मुंबई महापालिकेने घेतलेला निर्णय योग्य ठरणार नाही. लसीकरण करताना लसींचा पुरवठा किती होतो आहे, याचा विचार करून नियोजन करावे लागते. एका दिवसात सर्व लसी तयार होत नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांनी येथील सुपर स्पेशालिटीतील कोविड रुग्णालयाची पाहणी के ली. यावेळी त्यांनी जिल्ह्य़ातील करोनाची परिस्थिती, औषधांचा साठा, खाटा तसेच प्राणवायूचा पुरवठा आणि लसीकरण मोहीम याविषयी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून जाणून घेतले.

अमरावती जिल्ह्य़ाचा आढावा घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेऊन विभागातील पाचही जिल्ह्य़ांचा आढावा घेतला आणि संपूर्ण विभागातील करोनाची परिस्थिती जाणून घेतली. सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील भेटीदरम्यान फडणवीस यांनी तेथील डॉक्टरांशी देखील संवाद साधला. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या सेवेबद्दल त्यांनी डॉक्टरांचे अभिनंदन करीत आभारही मानले. अद्यापही करोनाचे संकट किती दिवस राहील, याचा अंदाज नसल्याने येणाऱ्या काळात सर्व रुग्णसेवकांना अशाच पद्धतीने काम करावे लागणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकु ळे, राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, आमदार रवी राणा, महापौर चेतन गावंडे, भाजपचे प्रवक्ते शिवराय कु ळकर्णी, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातूरकर, तुषार भारतीय, दिनेश सूर्यवंशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.