उस्मानाबाद

भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार सारिका काळे हिला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. वयाच्या अकराव्या वर्षापासून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या सारिका काळे हिने अनेक राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये संघाला सतत विजय मिळवून दिला आहे. तिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्ह्याच्या गौरवात भर पडली असल्याची भावना आहे.

वयाच्या अकराव्या वर्षी सारिकाने क्रीडाक्षेत्रात पाऊल टाकले. शालेय स्तरावरील खो-खो स्पर्धेतील तिचे थक्क करणारे क्रीडाकौशल्य कौतुकास्पद होते. २००६-०७ मध्ये तिची महाराष्ट्र संघात निवड झाली. आपल्या अथक परिश्रमाने सलग २० राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने संघाला यश मिळवून दिले. सांघिक खेळांमध्ये १२ सुवर्ण व चार कांस्यपदके तिने महाराष्ट्र संघाला मिळवून दिली. २०१०-११ मध्ये महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी तिची निवड झाली. छत्तीसगढमध्ये झालेल्या स्पर्धांमध्येही तिने सुवर्णपदक मिळवले. नंतर तीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने कर्णधारपद भूषविले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१५-१६ मध्ये तिची भारतीय संघात निवड झाली. तिच्या नेतृत्वाखाली भारतास सुवर्णपदक मिळाले. २०१६मध्ये आसाम गुवाहाटी येथील खो-खो स्पर्धेसाठी कर्णधारपदी निवड व तेथेही तिने सुवर्णपदक असा तिचा प्रवास झाला. क्रीडा क्षेत्रातील नैपुण्यामुळे राज्य शासनाच्या शिवछत्रपती राज्यस्तरीय पुरस्कारासह अन्य पुरस्कारानेही तिचा सन्मान करण्यात आला. शासनाने तिचा गौरव करत तालुका क्रीडा अधिकारीपदी नियुक्ती केली. सारिता सध्या तुळजापूर तालुका क्रीडाधिकारी म्हणून कार्यरत आहे. तिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार तिला २९ ऑगस्टला दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे.