अंतिम आठवडा प्रस्तावावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाआघाडी म्हणजे अमर, अकबर, अ‍ॅन्थोनी सरकार असल्याची टीका सुरेश धस यांनी केली. विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.

अमिताभ बच्चनचा ट्रिपल रोल असलेला ‘महान’ सिनेमा चालला नाही. मात्र, एकटी भूमिका असलेला ‘कालिया’ चांगलाच गाजला. त्यामुळे हे तिहेरी सरकार फार काळ टिकणार नसल्याची टीका करीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विकासकामांचा पाढा सुरेश धस यांनी प्रस्तावावर बोलताना वाचला. चर्चेची सुरुवात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या भाषणाने झाले.

त्यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा दाखला दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हेक्टरी २५ हजारांच्या मदतीचा दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी त्यांनी केली. दरेकरांच्या भाषणावर किरण पावसकर यांनी चिमटे काढले. विरोधी पक्षनेत्यांचा हा प्रस्ताव बिनबुडाचा असल्याचा आरोपही त्यांनी केला.

रामदेवबाबांना देण्यात आलेल्या जमिनीवर काय काम झाले यांची सर्वाना माहिती आहे. त्यामुळे सरकारकडून त्यांना काही मदत करण्यात आली असेल तर ती तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी पावसकर यांनी केली.  दरेकर यांनी मांडलेल्या प्रस्तावर चर्चा सुरू असताना स्वत: उपस्थित नसल्याचा आरोप पावसकर यांनी केला. तेव्हा विरोधकांनी चर्चेदरम्यान मंत्री उपस्थित नसल्याचा आरोप करीत गोंधळ घातला.

यावरून तालिका सभापती प्रकाश गजभिये यांनी दहा मिनिटासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यानंतर रामहरी रूपनवर यांनी विरोधकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. निर्मळ मनाच्या व्यक्तीला आम्ही राज्याच्या सिंहासनावर बसवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एवढय़ा उदार अंत:करणाचे आहेत की त्यांनी स्वत:कडे एकही खाते ठेवलेले नाही. आमचे सरकार हे येणाऱ्या काळात राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणार असून विरोधकांचा प्रस्ताव हा त्यांचा नाकर्तेपणा दाखवणारा असल्याचा आरोप रूपनवर यांनी केला.

..तर राजीनामा देतो

राज्यातील महाआघाडी सरकारने सत्तेत येताच विकासकामांना स्थगिती दिल्याचे सर्व पुरावे व शासन निर्णय आपल्याकडे आहेत, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला. यावर सदस्य किरण पावसकर यांनी हरकत घेत कुठला शासन निर्णय आहे, तर आम्हाला दाखवावे अशी मागणी केली. त्यावर प्रतिउत्तर देताना दरेकर यांनी या पवित्र सभागृहात मी खोटा बोलत असेल तर राजीनामा देईन, अशी घोषणा केली. त्यावर पावसकर यांनी तुम्ही पाच वर्षांच्या सरकारमध्ये २० हजार जरी रोजगार दिल्याचे दाखवून दिले तर मी स्वत: राजीनामा देतो, असे सांगितल्याने परिषदेत राजीनामा नाटय़ रंगले.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पुरवणी मागण्यांमध्ये भरपाईसाठी मागण्यात आलेली मदत तोटकी आहे. कायदा व सुव्यवस्था, माच्छीमारांचे झालेले नुकसानाचा प्रश्न उपस्थित करीत त्यांना ५०० कोटींच्या मदतीची मागणी दरेकर यांनी केली.