कार आणि सरकार दोन्हीही सुरळीत सुरु आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. माझं बळ हे लोकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे. स्टेअरिंग कुणाच्या हाती? पुढे कोण बसलं आहे मागे कोण बसलं आहे हे महत्त्वाचं नाही. आमचं सरकार समन्वयाने सुरु आहे. आरोप सगळ्यांवर केले जातात. बोलणारे खूप लोक आहेत मी कुणाचाही पर्वा करत नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आहोत. आमच्या नात्याची कुणीही चिंता करु नये. बाळासाहेब ठाकरे भाजपाला काय म्हणायचे हे सगळ्यांना ठाऊक आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. माझा व्हिजन, माझा महाराष्ट्र या एबीपी माझाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

भाजपासोबत आमचा घटस्फोट

भाजपासोबत आमचा घटस्फोट झाला. त्याची कारणं सगळ्यांना ठाऊक आहेतच. भाजपासोबत आम्ही तीस वर्षे होतो. पण त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला नाही पण काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्याविरोधात आम्ही लढलो त्यांनी मात्र माझ्यावर विश्वास दाखवला. माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे किमान समान कार्यक्रमावर सुरु आहे. या सरकारला कोणताही धोका नाही. माझ्यावर लोकांनी विश्वास दाखवला आहे. त्यांचा विश्वास हेच माझं बळ आहे. त्यांच्यासाठी मी खुर्चीवर बसलो आहे. माझ्या स्वार्थासाठी मी खुर्चीवर बसलेलो नाही असंही उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावलं आहे.

काही दिवसांपूर्वीच सरकारचं स्टेअरिंग माझ्या हातीच आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं ज्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत उद्धव ठाकरेंच्या हाती स्टेअरिंग असलं तरीही जायचं कुठे ते मात्र मागे बसलेले सांगतात असं वक्तव्य केलं होतं. या अनुषंगाने जेव्हा उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा कार आणि सरकार दोन्ही सुरळीत सुरु आहे असं वक्तव्य करुन खास आपल्या शैलीत त्यांनी भाजपाला उत्तर दिलं आहे.