मत्स्यव्यावसायिकांना भरीव मदत

मुंबई : जूनच्या पहिल्या आठवडय़ात राज्यात धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात काही जिल्ह्य़ातील शेती, घरांचे व मासेमारी करणाऱ्या बोटींचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्य शासनाने मदतीचे प्रचलित निकष बदलून चक्रीवादळग्रस्तांना वाढीव अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषत शेतकऱ्यांबरोबरच आता बोटींच्या नुकसानीबद्दल भरीव मदत देण्याचा निर्णय घेऊन शासनाने मत्स्यव्यवसायिकांनाही दिलासा दिला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या कोणत्या नुकसानीबद्दल किती अर्थसाहाय द्यायचे याचे केंद्र व राज्य सरकारने निकष ठरविलेले आहेत. परंतु नुकसानीची तीव्रता लक्षात घेऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत अधिकची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रचलित निकषांमध्ये बदल करून व विशेष बाब म्हणून चक्रावीदळग्रस्तांना वाढील आर्थिक मदत देण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

घरांच्या नुकसानीबद्दल १५ हजारांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत; तसेच भांडी, कपडे व इतर वस्तू घेण्याकरिता १० हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. पूर्वी ही मदत ५ हजार ते १२ हजार रुपयांपर्यंत दिली जात होती. पूर्णत घर नष्ट झाले असल्यास, पूर्वी एक लाख रुपये दिले जात होते, ते आता सरसकट १ लाख ५० हजार रुपये करण्यात आले आहेत.

मदत अशी..

मासेमारी करणाऱ्या बोटी व जाळ्यांच्या नुकसानीसाठी पूर्वी २६०० ते ९६०० रुपये इतकी भरपाई दिली जात होती. आता ५ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. घर, भांडी, कपडे, बोटी यांच्या नुकसानीसाठी पूर्वीच्या मदतीपेक्षा ही जवळपास दुप्पट मदत आहे. शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरी १८ हजारांऐवजी ५० हजार रुपये मदत देण्याचा राज्य सरकारने याआधीच निर्णय घेतला आहे.