महाराष्ट्रात लॉकडाउन ३० जूनपर्यंत कायम राहणार आहे. मात्र त्याचवेळी ‘मिशन बिगीन अगेन’ या नव्या धोरणातंर्गत अनलॉकडाउन 1.0 ही सुरु झाले आहे. महाराष्ट्रात प्रार्थना स्थळे, हॉटेल, मॉल्स बंदच राहणार आहेत. पण त्याचवेळी काही नव्या गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे.

मिशन बीगिन अगेनचा दुसरा टप्पा ५ जूनपासून सुरू होणार आहे. यामध्ये दुकानांना परवानगी देण्यात आली आहे.

– पाच जूनपासून सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी असेल. मात्र, मार्केट कॉम्प्लेक्स आणि मॉल्स यांना परवानगी नसेल. परंतु यासाठी नियम असेल तो म्हणजे पी1 आणि पी2 असा. म्हणजेच रस्त्याच्या/लेनच्या किंवा पॅसेजच्या एका बाजूची दुकानं एका दिवशी सुरू असतील तर दुसऱ्या बाजूची दुकानं दुसऱ्या दिवशी सुरू असतील. परंतु त्यांना केवळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ याच काळात दुकाने सुरु ठेवता येतील.

 

– कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम वापरण्याची परवानगी नसेल. कारण त्यातून करोना संसर्ग पसरण्याचा धोका आहे. शिवाय कोणत्याही प्रकारच्या कपडे एक्स्चेंज किंवा रिटर्न करू देण्याचीही परवानगी नसेल.

– लोकांनी दुकानांवर किंवा मार्केटमध्ये जाताना पायी किंवा सायकलवर जावे. शक्यतो जवळच्याच दुकानांचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंसाठी दूरचा प्रवास करण्यास परवानगी नसेल. शिवाय, यासाठी वाहनही वापरता येणार नाही.

– एखाद्या मार्केटमध्ये सोशल डिस्टंन्सिंगचा वापर केला जात नसल्याचे आढळल्यास, ते मार्केट तत्काळ बंद करण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांकडे असतील.

– नियमांचे उल्लंघन झाले तर संबंधित यंत्रणा लगेच दुकान बंद करु शकतात.

२. टॅक्सी, कॅब आणि रिक्षा यांनाही ५ जूनपासून परवानगी असेल. मात्र त्यासाठी १+२ अशा संख्येचे बंधन असेल. म्हणजेच चालक अधिक दोन प्रवासी घेऊन आता टॅक्सी, कॅब आणि रिक्षा सुरू करता येतील. चार चाकी वाहनांसाठीही हाच नियम असेल. मात्र दुचाकीवरून एकाच व्यक्तिला प्रवास करता येईल.