हुतात्म्यांना आदरांजली वाहताना पोलिसांनी ताब्यात घेतले

कोल्हापूर : कडेकोट बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांना चकवा देत राज्याचे सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बेळगावात  सीमा लढय़ातील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. बेळगावपर्यंतच्या प्रवासात चकवा देण्यात यशस्वी ठरलेल्या यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडले. प्रतिबंधात्मक आदेशाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांचे कडे भेदून पुन्हा एकदा शिवसेनेने यड्रावकरांच्या रूपाने बेळगावात धाव घेतली. दरम्यान, बेळगावसह सीमाभागात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

सीमा लढय़ातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम शुक्रवारी मराठी भाषिकांनी बेळगावमध्ये आयोजित केला होता. याकरिता संयोजकांनी राज्याचे नगर विकासमंत्री तथा सीमा लढय़ाचे समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित केले होते. रात्री उशिरा त्यांचा दौरा रद्द झाला. मात्र त्यांचे स्वीय सहायक मंगेश चिवटे यांनी कोल्हापुरात येऊ न शिवसेनेचे सहयोगी आमदार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी गनिमी कावा करत बेळगाव गाठण्याचे नियोजन केले आणि छुप्या पद्धतीने बेळगाव गाठले परंतु कर्नाटक पोलिसांनी त्यांना हुतात्म्यांना आदरांजली वाहू दिली नाही.

विठाई आणि निळाई

यड्रावकर हे सकाळी चिवटे आणि मुंबईहून आलेल्या काही सहकाऱ्यांसह कोल्हापूर येथून खासगी वाहनातून बेळगावच्या दिशेने निघाले. कागल येथे पोहोचल्यावर त्यांनी परिवहन महामंडळाच्या बसमधून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या ‘विठाई’बसमध्ये ते बसले. महाराष्ट्र कर्नाटक सीमेला जोडणाऱ्या कोगनोळी नाका येथे प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. इथे पोलिसांनी बस मध्ये येऊ न पाहणी केली पण या वेळी त्यांना चकवा देण्यात यड्रावकर यशस्वी ठरले. पुढे दूधगंगा नदी ओलांडल्यावर पोलिसांनी पुन्हा ही बस अडवली. येथेही ही पोलिसांना गुंगारा देण्यात यड्रावकर आणि त्यांचे सहकारी यशस्वी झाले. नंतर या मंडळींनी कर्नाटक परिवहन मंडळाच्या निळ्या बसमधून (निळाई) प्रवास केला.

कर्नाटक पोलिसांची बळजबरी

बेळगावमध्ये पोहोचल्यावर या सर्वानी रिक्षा करून अभिवादन स्थळ असलेला हुतात्मा चौक गाठला. मात्र राज्यमंत्री यड्रावकर यांना पाहताच कर्नाटक पोलिसांचे पित्त खवळले. त्यांनी त्यांना अभिवादन करण्यापासून रोखले. ‘हुतात्मा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतो’ अशी विनंती यड्रावकर पोलिस अधिकाऱ्यांना करीत होते. या वेळी त्यांच्यासोबत बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, युवा आघाडीचे सूरज कणबरकर हे देखील कर्नाटक पोलिसांना विनंती करत होते. परंतु त्यांची ही विनंती धुडकावून लावत कर्नाटक पोलिसांनी यड्रावकर यांना बळजबरीने गाडीत कोंबले. त्यांना बेळगाव येथील पोलीस आयुक्तालयात नेण्यात आले. त्यानंतर दुपारी कर्नाटक पोलिसांनी त्यांना पोलिस बंदोबस्तात कागल येथे आणून सोडले.

दडपशाहीचा निषेध

हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावला गेलो असताना कर्नाटक पोलिसांनी आम्हाला एखाद्या अतिरेक्याप्रमाणे वागणूक दिली. मंत्री असतानाही अशा पद्धतीची वागणूक आम्हाला मिळत असेल, तर बेळगाव आणि सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषकांना कर्नाटक शासनाच्या अत्याचाराला रोज कसे तोंड द्यावे लागत असेल याची कल्पना करवत नाही. कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करतो.

– राजेंद्र पाटील यड्रावकर