जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई : विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या ठरावावर बोलताना, मंत्रिमंडळातून सहा मंत्र्यांना का वगळले आणि काही मंत्र्यांची खाती का काढून घेतली, त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही बुधवारी मंत्रिमंडळ विस्तारावरून सभागृहात भाजप-शिवसेनेवर टोलेबाजी केली होती. जयंत पाटील यांनीही त्यांच्या खास तिरकस शैलीत सत्ताधारी पक्षांना कोपरखळ्या मारल्या. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यात १३ नवीन मंत्र्यांचा समावेश केला, सहा मंत्र्यांना वगळले आणि विनोद तावडे, राम शिंदे, जयकुमार रावल, सुभाष देशमुख या मंत्र्यांची काही खाती काढून घेतली. आता मुख्यमंत्र्यांनी नवीन मंत्र्यांचा जसा परिचय करून दिला, त्याचप्रमाणे सहा मंत्र्यांना का वगळले आणि काहींची खाती का काढून घेतली याचीही माहिती महाराष्ट्राच्या जनतेला दिली पाहिजे, असे ते म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्तार करताना राजकुमार बडोले, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, राजे अंबरीश आत्राम या मागास-दुर्बल वर्गातील मंत्र्यांना वगळण्यात आले, हा त्यांच्यावर अन्याय झाल्याचे पाटील म्हणाले.