राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशापेक्षा महाराष्ट्राला निसर्गाने भरभरून दिले आहे. मात्र महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट असतानाही पाणी वापराबद्दल कुठेही शिस्त दिसत नाही. या राज्याला पाणी वापरासाठी शिस्तीची गरज आहे, असे प्रतिपादन मॅगसेसे पुरस्कार विजेते व पाणीवाला बाबा म्हणून सर्व देशभर परिचित असलेले जलतज्ज्ञ  डॉ. राजेंद्र सिंह यांनी वाडा येथे व्यक्त केले.
येथील वैतरणा शेतकरी मंडळ, संत तुकाराम राष्ट्रीय विकास परिषद व जायंट्स ग्रुप ऑफ वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने जलव्यवस्थापन या विषयावर मंगळवारी वाडा येथे शेतकऱ्यांसाठी जलतज्ज्ञ  डॉ. राजेंद्र सिंह यांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. या वेळी माजी कुलगुरू डॉ. अरुण सावंत, शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश इंगळे व ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक आर. एस. नाईकवाडी आदी मान्यवरांनीही शेतकऱ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील कोकण प्रांत देवाचा लाडका पुत्र आहे. लाडकी मुले बिघडतात त्या वेळी परिस्थिती बिकट होते, असे  डॉ. राजेंद्र सिंह यांनी या वेळी सांगून भरपूर पर्जन्य, चांगल्या प्रतीची जमीन असूनही येथील शेतकऱ्यांना पाण्याअभावी जमीन कोरडी ठेवावी लागते हे येथील शेतकऱ्यांचे दुर्दैव असल्याचे  डॉ. राजेंद्र सिंह यांनी या वेळी सांगितले. ब्रिटिशकालीन धोरणांमुळे नद्यांची गटारे होण्यास सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात तर नद्याच लुप्त होऊ लागल्या आहेत. राजस्थानातील वाळवंट बाष्पीभवन टाळून जलपुनर्भरणाची पारंपरिक कामे सुरू झाली आहेत. सध्या कोणतेही मोठे धरण इतके पाणी साठवू शकत नाही, इतके पाणी लोकसहभागातून अलवार जिल्ह्य़ात बांधलेले बंधारे साठवून ठेवत आहेत, अशी माहिती डॉ. राजेंद्र सिंह यांनी या वेळी दिली.