नगर : सीरम इन्स्टिटय़ूटचे अदर पूनावाला यांना मिळालेल्या धमकी प्रकरणाच्या मुळापर्यंत पोलिस शोध घेतील. भारताबाहेर तपास करण्याचीही महाराष्ट्र पोलिसांची क्षमता आहे. मात्र त्यासाठी पूनावाला यांनी कोणत्या क्रमांकावर धमकीचा फोन आला, कोणाकडून मिळाला याची सविस्तर माहिती पोलिसांना द्यावी. धमकी देणारा कोणीही असला तरी कारवाई केली येईल, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

गृहराज्यमंत्री देसाई आज, रविवारी सायंकाळी औरंगाबादहून नगरमध्ये आले. त्यांनी जिल्ह्यातील करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा जिल्हा पोलीस दलातील प्रमुख अधिकाऱ्यांकडून घेतला. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दीपाली काळे आदी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अदर पूनावाला यांना मिळालेल्या धमकी संदर्भातील भूमिका गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केली.

देसाई म्हणाले,की सीरम इन्स्टिटय़ूटचे प्रमुख अदर पूनावाला यांना करोना लसीसाठी धमकी मिळाल्यानंतर त्यांना राज्य सरकारने ‘वाय’ दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यांच्या सुरक्षेबाबत कुठलीही चूक होऊ देणार नाही. त्यांना योग्य ती सुरक्षा पुरविण्यात येईल.

पूनावाला हे सध्या परदेशात असल्याचे समजते. त्यांनी त्यांच्या कोणत्या मोबाइल क्रमांकावर त्यांना धमकी देण्यात आली याची माहिती महाराष्ट्र पोलिसांना द्यावी. त्यावरून आरोपींचा शोध घेण्यास महाराष्ट्र पोलिस सक्षम आहेत. धमकी देणारा कुणीही असो, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी पूनावाला यांनी महाराष्ट्र पोलिसांना वेळ द्यावा, असेही देसाई म्हणाले.करोना  संदर्भातील आरोग्यकाम करताना जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला ५० लाख रुपये देण्याचा निर्णय पहिल्या करोना लाटेवेळी घेण्यात आला होता. त्यानंतर मध्यंतरी तो थांबवण्यात आला होता. पण आता पुन्हा नव्याने तसा आदेश काढला जाणार आहे असेही देसाई म्हणाले.