News Flash

उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेस निवडणूक निधीचे २० लाख दिले ‘सीएम रिलीफ फंडा’ला

काँग्रेस निवडणुकीच्या खर्चासाठी दिले होते ५० लाख

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर. (संग्रहित छायाचित्र)

शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या निवडणूक निधी खात्यातून २० लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधी अर्थात सीएम रिलीफ फंडाला दिल्याची माहिती समोर आली आहे. उर्मिला मातोंडकर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ५० लाखांचा निधी काँग्रेसकडून देण्यात आला होता. त्यातील २० लाख रुपये त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत म्हणून दिले. या पैशावरून आता चर्चा सुरू झाली असून, त्यावर ऊर्मिला मातोंडकर यांनी भूमिका मांडली आहे.

वर्षभरापूर्वी उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गेल्या महिन्यात उर्मिला यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, २०१९ लोकसभा निवडणुकीत उर्मिला यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली होती. त्यांनी उत्तर मुंबईतून भाजपाचे गोपाल शेट्टी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.

निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे उर्मिला मातोंडकर यांनी निवडणूक खर्चासाठी कांदिवलीतील सार्वजनिक बँकेत संयुक्त खातं उघडलं होतं. महाराष्ट्र काँग्रेसचे महासचिव अशोक सुत्राळे हे या संयुक्त खात्याचे खातेधारक होते. निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला खर्चाचं बंधन घातलेलं असून, उमेदवाराला ७० लाखांपर्यंत खर्च करण्याची मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र काँग्रेसनं एप्रिल २०१९ मध्ये ऊर्मिला यांच्या निवडणूक प्रचारासाठी सुरू केलेल्या संयुक्त खात्यात ५० लाख रुपये जमा केले होते.

या खात्यातून निवडणुकीसाठी ३० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. तर २० लाख रुपये जुलै २०२० पर्यंत खात्यात शिल्लक होते. ऊर्मिला मातोंडकर यांनी या खात्यातील २० लाख रुपये जुलैमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीला मदत म्हणून दिले. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर ही मदत देण्यात आली. त्यामुळे याची चर्चा सुरू झाली.

याबद्दल स्वतः ऊर्मिला मातोंडकर यांनी भूमिका मांडली आहे. “सीएम रिलीफ फंडाला दिलेल्या मदतीवरून काही कुख्यात लोक कथा रचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या परवानगीनेच हे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आले. करोनाच्या काळात लोकांच्या कल्याणासाठीच मी या पैशाचा वापर केला,” असं ऊर्मिला यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 4:20 pm

Web Title: maharashtra politics urmila matondkar maharashtra congress donates rs 20 lakh congress poll money cms relief fund bmh 90
Next Stories
1 सरपंचपदाची बोली बोलायची व बोलीतून निवडून यायचं हा लोकशाहीचा खून – चंद्रकांत पाटील
2 करोनाच्या नव्या प्रकारासंबंधी राजेश टोपे यांची महत्वाची माहिती; म्हणाले…
3 कोसळलेल्या शेतकऱ्यानं जागीच सोडला प्राण; व्हिडीओ ट्विट करत काँग्रेस नेता म्हणाला,…
Just Now!
X