राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमीकमी होताना दिसत आहे. करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या सातत्याने अधिक आढळत आहे. निश्चितच ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. आज दिवसभरात राज्यात ११ हजार २०४ जण करोनामुक्त झाले. तर, आतापर्यंत राज्यभरात एकूण १३ लाख ६९ हजार ८१० जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ८५.८६ टक्क्यांवर पोहचला आहे.

राज्यात आज दिवसभरात ९ हजार ६० नवे करोनाबाधित आढळले असून, १५० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. याचबरोबर राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १५ लाख ९५ हजार ३८१ वर पोहचली आहे. यामध्ये १ लाख ८२ हजार ९७३ अॅक्टिव केसेस, डिस्चार्ज मिळालेले १३ लाख ६९ हजार ८१० जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ४२ हजार ११५ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.सद्यस्थितीस राज्यात २४ लाख १२ हजार ९२१ जण गृहविलगीकरणात आहेत. तर, २३ हजार ३८४ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

 

देशात सामूहिक संसर्ग झाला आहे पण तो काही राज्यांपर्यंतच मर्यादित असून अद्याप सर्वत्र पसरलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. ‘संडे संवाद’ या त्यांच्या सोशल मीडियातील कार्यक्रमात ते बोलत होते,

फेब्रुवारी २०२१ पर्यंत करोनाचं संकट आटोक्यात येईल असा दावा सरकारने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीने केला आहे. सध्याच्या घडीला भारतात करोनाची साथ तिच्या सर्वोच्च सीमेवर आहे. आता करोनाच्या साथीचा आलेख हळूहळू ढासळण्यास सुरुवात होईल. फेब्रुवारी २०२१ पर्यंत भारतातील करोनाची साथ आटोक्यात येईल असंही वैज्ञानिकांच्या या समितीने म्हटलं आहे. हळूहळू या साथीचा प्रादुर्भाव कमी होईल असंही या समितीने म्हटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले आहे