रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्‍यात असलेल्या धाटाव एमआयडीसी येथील सुदर्शन केमिकल लिमिटेड या कंपनीच्या डी.सी एल. स्टोअरेज प्लॅन्टला मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली. आग इतकी भीषण होती की रात्रीत संपूर्ण परिसरात आगीचे लोट दिसून आले. सुरूवातीला झालेल्या आवाजाने परिसरात हादरा बसल्याने स्फोट झाल्याची भीती व्यक्त केली जात होती.

रात्री पावणे बाराच्या सुमारास आग लागल्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन व रोहा नगर पालिका व एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर अग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर पूर्ण पणे नियंत्रण मिळवण्यात यश आलं.

या आगीत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. परंतु यात कंपनीनं तयार केलेले अनेक प्रोडक्ट आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेय. त्यामुळे यात कोट्यवधींचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे