राज्यात युतीचे ४१ खासदार आहेत, त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असे वक्तव्य राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या बैठकीतही भाजपाचाच मुख्यमंत्री होण्यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागा असेच आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री भाजपाचाच हा नारा दिल्याने शिवसेना नाराज झाली आहे का? हे विचारले असता शिवसेनेचा कोणताही नाराजीचा सूर नाही. मिले सूर मेरा तुम्हारा, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे असे म्हणत आम्ही काम करू आणि करतो आहोत असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त काका आणि पुतण्या यांचे एकमत व्हावे अशी इच्छा आहे असा टोलाही मुनगंटीवार यांनी शरद पवार आणि अजित पवार यांना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसने जेव्हा आम्ही चुकलो तेव्हा आमच्यावर अभ्यासपूर्ण टीका केली आहे. पुढची २५ वर्षे त्यांनी अशीच अभ्यासपूर्ण टीका करावी असेही मुनगंटीवार यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे.

रविवारी देशाचे गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी महाराष्ट्राची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. तसेच पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असाही दावा त्यांनी केला. भाजपाने हा दावा केल्यानंतर शिवसेनेतून नाराजीचा सूर समोर येतो आहे असे समजते आहे. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र शिवसेनेची अशी कोणतीही नाराजी नाही असे म्हटले आहे. तसेच पुढचा मुख्यमंत्री भाजपाचाच होणार असेही स्पष्ट केले आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय होणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी नाराजी नाही असं सांगितलं जातं आहे. मात्र अजून काय काय दावे समोर येतात आणि त्याला शिवसेना कशाप्रकारे प्रतिक्रिया देते हे स्पष्ट होणार आहेच.