मालेगाव शहरात उद्भवलेल्या करोना संकटाचा मुकाबला करताना प्रशासनाची दमछाक होत असताना, महापालिकेचे काही कर्मचारी नेमून दिलेल्या कामावर हजरच होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशाप्रकारे कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्याद्वारे गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली आहे. आतापर्यंत एकूण ४७ जणांवर अशा स्वरुपाची कारवाई करण्यात आली असून करोनासारख्या आणीबाणीच्या काळात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुळीच गय केली जाणार नाही, असा इशारा आयुक्त दीपक कासार यांनी दिला आहे.

कायम स्वरुपातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे मालेगाव महानगरपालिकेने कार्यालयीन व प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टिकोनातून मानधन तत्वावर कर्मचाऱ्यांची नेमणुक केलेली आहे. कायम व मानधनाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरात उद्भवलेल्या करोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी तसेच या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे.याच अनुषंगाने कायम व मानधनावरील कर्मचाऱ्यांना महापालिकेने शहरात करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध स्वरुपातील काम वाटपाचे नियोजन केले आहे. त्या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या कामाचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु महापालिकेत कार्यरत असणारे 14कर्मचारी हे आदेशानंतरही नेमून दिलेल्या कामाच्या ठिकाणी हजर झाले नाहीत. प्रशासनातर्फे त्यांना वारंवार समज देण्यात आली. मात्र त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही आणि ते कामावरही हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा प्रशासनाने घेतला आहे.

या 14 जणांमध्ये सहा कायम व आठ मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील तीन जण डॉक्टर असून एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि दोन मिश्रक आहेत. उर्वरीत मानधनावरील चार सहाय्यक कनिष्ठ अभियंता, दोन लिपीक-संगणक चालक व एक जण शिपाई आहे. या सर्वांवर भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये किल्ला पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

नव्याने नियुक्त झालेल्या आयुक्त कासार यांनी आल्याआल्या कामावरुन विना परवानगी गैरहजर असणाऱ्या ३३ सुरक्षा कर्मचाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली होती. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात आणखी 14 जणांवर गुन्हे नोंदवल्याने अन्य कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.