उपचारादरम्यान  रुग्ण दगावल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात धुडगूस घातल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. यावेळी अतीदक्षता विभागातील कुलरची नासधुस करण्यात आली. तेथील सिलेंडर फेकून देण्यात आले तसेच परिचारिकेस शिवीगाळही करण्यात आली.

हे वृत्त समजल्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा सामान्य रुग्णालयात दाखल झाला. त्यांनी गोंधळ घालणाऱ्या  नातेवाईकांना ताब्यात घेतले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान हा गोंधळ सुरू असतानाच अतिदक्षता विभागात उपचार घेणारी दुसऱ्या एक वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या वृद्धेला उच्च रक्तदाबाचा त्रास  होता  अशी माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली. तर मृत्यू  झालेल्या रुग्णास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले  होते. मात्र उपचारादरम्यान थोड्याच वेळात त्यांचे निधन झाले. त्यानंतर डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप ठेवत नातेवाइकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.