पावसाळ्यात कुपोषित बालक-मातांची संख्या वाढण्याची शक्यता

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : टाळेबंदीत  जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त आदिवासीबहुल भागातील अंगणवाडय़ा तसेच आरोग्य यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाल्याने त्याचा परिणाम कुपोषण बालक-मातांच्या वाढीवर होत आहे.  एप्रिल २०२० मध्ये अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या २१३  इतकी होती. तर मे मध्ये ती १३ ने वाढली आहे. जूनमध्ये ही संख्या ८ ने वाढून ती २३४  झाली आहे.  आता पावसाळा सुरू असल्याने संख्या अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पालघर जिल्ह्य़ात २०१६ मध्ये ८६१ अतितीव्र कुपोषित बालके होती तर ५६५ बालकांचा मृत्यू झाला होता. त्याचे गांभीर्य लक्षात घेत शासन, प्रशासनाने कुपोषण निर्मूलनासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. विविध उपाययोजना राबविल्या गेल्याने कुपोषित बालकांसह माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण कमी झाले होते.

अलीकडे जिल्हा परिषदेमार्फत या अतितीव्र व तीव्र कुपोषित बालकांना तसेच स्तनदा व गरोदर मातांना घरी जाऊन ग्राम बाल विकास केंद्रच्या माध्यमातून सकस व पोषण आहार देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. असे असले तरी एप्रिल महिन्यामध्ये असलेली आकडेवारी लक्षात घेता मे व जूनमध्ये अतितीव्र कुपोषित बालकांचा आकडा वाढला आहे. यावेळी एप्रिल २०२० मध्ये अतितीव्र कुपोषित बालकांची संख्या २१३  इतकी होती. तर मे मध्ये ती १३ ने वाढली असून २२६ नोंदविण्यात आली झाली. तर जून मध्ये जून मध्ये ही संख्या ८ ने वाढली असून ती २३४ बालके आढळून आलीजून २०१९ मध्ये तीव्र कुपोषित बालकांची संख्या दोन हजार ३९६ होती तर यंदा ही संख्या दोन हजार २२५ इतकी आहे. याचाच अर्थ ही संख्या १७१ बालकांनी घटल्याचे दिसून येते. पालघर जिल्ह्यात जून अखेर एकूण एक हजार ३३६  ग्राम बालविकास केंद्रे असून यामध्ये १४५ अतितीव्र कुपोषित बालके तर दोन हजार २२० तीव्र कुपोषित बालके उपचार घेत आहे.

टाळेबंदीतही स्तनदा माता, गरोदर माता यांच्या बरोबरीने बालकांना विविध विभागाच्या समन्वयाने ग्राम बालविकास केंद्र व संवादाच्या माध्यमातून सकस व पोषण आहार देऊन कुपोषण निर्मूलनासाठी प्रयत्नशील आहोत.

– राजेंद्र पाटील, विभागप्रमुख,  महिला व बालकल्याण विभाग.