|| वैष्णवी राऊत

वसई तालुक्यातील कुपोषित बालकांची संख्या घटली

कुपोषण रोखण्यासाठी शासनाने केलेले प्रयत्न, ग्राम बालविकास केंद्राची वाढवलेली संख्या यांमुळे वसई तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या वर्षी वसई तालुक्यात ४३ तीव्र कुपोषित बालके होती, त्यांची संख्या यंदा सात झाली आहे.

२०१६ मध्ये संपूर्ण पालघर जिल्ह्यात सुमारे आठ हजार बालके कुपोषित असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती, तर त्यातील ६०० बालकांचा मृत्यू झाल्याची घटनाही २०१६ मध्ये घडली होती. पालघर जिल्ह्यातील वाढत्या कुपोषणाची झळ तेव्हा वसई तालुक्यालाही लागली होती. वसई पंचायत समितीच्या बालविकास विभागामार्फत तालुक्यातील नऊ मुख्य सेविकांच्या विभागात दर महिन्याला सर्वेक्षण करण्यात येते. २०१५ मध्ये या सर्वेक्षणात तालुक्यात १८ तीव्र कुपोषित बालके आढळली होती, तर २०१७ मध्ये ४३ तीव्र कुपोषित बालकांचा समावेश होता. परंतु यंदा २०१८ मध्ये कुपोषणाचा आलेख खालावला आहे. सध्या तालुक्यात तीव्र कुपोषित बालकांची संख्या केवळ सात आहे, अशी माहिती वसई तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली.

या नऊ विभागांमार्फत ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना प्रत्येक महिन्याला ‘टीएचआर’ आहाराचे पाकीट दिले जाते, तर ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या स्वरूपांचा आहार दिला जातो. याव्यतिरिक्त सोमवार ते गुरुवार खिचडी आणि पौष्टिक लाडू, मंगळवार ते शुक्रवार लापशी आणि सोया लाडू, बुधवार ते शनिवार चण्याची उसळ आणि कुरमुरे चिवडा असा आहार दिला जातो, तर दुसरीकडे  कुपोषणमुक्त पालघर जिल्हा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार शून्य ते सहा वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांसाठी पालघर जिल्ह्यात २८५ ग्राम बालविकास केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. यामुळे पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या घटण्यात अधिक मदत होणार आहे.

बालके ग्रामविकास केंद्रात

या केंद्रांमार्फत बालकांना अतिरिक्त आहार पुरवठा, वैद्यकीय देखरेख, पालकांचे पोषणविषयक समुपदेशन या पायाभूत गोष्टींवर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बालकांचे नव्याने सर्वेक्षण करून सर्व बालकांचे वजन, उंची, दंडघेर, पायावरील सूज या निकषांवर पडताळणी करण्यात येऊन त्यामध्ये तीव्र कुपोषित आढळून येणाऱ्या बालकांना ग्राम बालविकास केंद्रात दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी नुकतेच जाहीर केले होते.