मोबाईल फोनवरून एटीएम कार्ड क्रमांक विचारुन बँक खात्यातून ४० हजार रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याप्रकरणी धुळे येथे एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दिलीपसिंग इंद्रसिंग गिरासे (४०) यांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोबाईलवर बँक ग्राहकांशी संपर्क साधून एटीएम क्रमांक विचारुन ऑनलाईन पद्धतीने फसवणूकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
दिलीपसिंग गिरासे यांना राहुलकुमार शर्मा नावाच्या व्यक्तीचा मोबाईलवर फोन आला होता. राहुलकुमारने ‘एटीएम सेवा सुरू ठेवायची असल्यास एटीएमचा १६ अंकांचा क्रमांक लगेच सांगावा लागेल’, असे सांगितले. यानंतर दिलीपसिंग यांनी त्यांचा एटीएम क्रमांक राहुलकुमारला दिला. यानंतर काही वेळातच दिलीपसिंग यांच्या बँक खात्यातून ३९ हजार ९९९ रुपयांची रोकड परस्पर काढून घेतली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गिरासे यांनी पोलिसांत धाव घेतली. यानंतर पोलिसांनी राहुलकुमार शर्माविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
धुळे जिल्ह्यात यापूर्वी मोबाईलवरुन एटीएम क्रमांक मागून फसवणूक झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे मोबाईलवर बँक खात्याचा तसेच एटीएम कार्डचा तपशील विचारणार्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र तरीही सामान्य लोक फसवणुकीला बळी पडत आहेत.