27 September 2020

News Flash

नरभक्षक ‘ठरवून’ वाघाची हत्या

सात जणांना ठार करणाऱ्या वाघाला नरभक्षक ठरवून पोंभुर्णा परिसरात मंगळवारी संध्याकाळी पोलीस नेमबाजांनी गोळ्या घालून ठार केले.

| August 20, 2014 01:33 am

सात जणांना ठार करणाऱ्या वाघाला नरभक्षक ठरवून पोंभुर्णा परिसरात मंगळवारी संध्याकाळी पोलीस नेमबाजांनी गोळ्या घालून ठार केले. मात्र आंबेधानोरा मार्गावर विसावलेला वाघ हाच नक्की नरभक्षक आहे की नाही याची कोणतीही खातरजमा न करता वाघाला ठार मारण्याचे आदेश देण्यात आल्याचा आरोप करीत या घटनेचा वन्यजीवप्रेमींनी तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच वनखाते व वाघाला ठार मारण्याची मागणी करणाऱ्या राजकीय नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, तर वाघाला ठार मारण्यात आल्याचे समजल्यानंतर गेले तीन महिने दहशतीच्या छायेत वावरणाऱ्या गावकऱ्यांनी मात्र सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
एक वाघीण व तिच्या दोन पिल्लांनी तीन महिन्यांत सात लोकांचे बळी घेतले. रविवारी वाघाने एका गावकऱ्याला ठार केल्यानंतर वाघाला ठार केले नाहीत तर आम्हीच मारू, अशी आक्रमक भूमिका गावकऱ्यांनी घेतली. येथील राजकीय नेत्यांनीही ही मागणी पूर्ण करण्याचा आग्रह धरल्याने प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्जन भगत यांनी रविवारी वाघाला नरभक्षक ठरवून गोळ्या घालण्याचे आदेश दिले. नरभक्षक ठरवून जिल्ह्य़ात घेतला गेलेला वाघाचा हा दुसरा बळी. यापूर्वीही चंद्रपुरातच ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत तळोधी येथे वाघाला अशाच प्रकारे नेमबाजांकडून ठार करण्यात आले होते.

पोलीस दलाचे सहा नेमबाज पोंभुर्णा येथे दाखल झाले. पोलिस दल व वन खात्याच्या पथकाने सलग दोन दिवस वाघाचा शोघ घेतला, परंतु वाघ या पथकाला चकवून जंगलात निघून जात होता. हा वाघ सातारा तुकूम येथे मुख्य रस्त्यावर विसावला होता. याची माहिती नेमबाज आणि वनखात्याला मिळाली. अखेर सायंकाळी वाघ दिसताच या नेमबाजांनी त्याला गोळ्या घातल्या.
– संजय ठाकरे, मुख्य वनसंरक्षक

एकूण २५ गोळ्या झाडल्या
या वाघावर जवानांनी एकूण २५ गोळ्या झाडल्या. जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळणाऱ्या या वाघाला त्यापैकी ३ गोळ्या लागल्या. त्यात त्याचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2014 1:33 am

Web Title: man eater tiger shot dead in chandrapur
टॅग Tiger
Next Stories
1 अबब! ३६ वर्षांनी आईच्या पोटातून बाळाचा सांगाडा काढला!
2 ‘गोविंदा रे गोपाळा’च्या गजरात कोल्हापुरात दहीहंडीचा थरार
3 आरक्षणात राजकारण्यांनीच जातीय भांडणे लावली
Just Now!
X