मे महिन्याच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात दुष्काळाने भयावह स्वरूप धारण केल्याचे चित्र आहे. धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये सध्या फक्त १७ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. सहा धरणे कोरडी ठणठणीत झाली असून आणखी सहा धरणांची वाटचालही त्याच दिशेने सुरू आहे. नाशिकमधील मनमाडची परिस्थिती तर आणखीच भयावह आहे. मनमाडकरांना तब्बल २१ दिवसांनंतर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतोय. त्यामुळे दागिन्यापेक्षा पाण्याची किंमत लोकांना जास्त वाटतेय. अशातच घरावर असलेल्या टाकीतून ३०० लिटर पाणी चोरीला गेल्याची तक्रार मनमाडमधील एका व्यक्तीनं पोलिसांत केली आहे. त्यामुळे पाणीचोराला पडकण्याचे मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. एरवी मंगळसूत्र, दुचाकी, पैसे किंवा मोबाइल चोरीची फिर्याद दाखल करून घेणाऱ्या पोलिसांनाही पाणी चोरीला गेल्याचा गुन्हा कसा दाखल करावा, याबाबत प्रश्न पडला असेल.

मनमाडमधील श्रावस्तीनगरात राहणाऱ्या विलास आहिरे यांच्या घराच्या छतावरील ५०० लिटर पाण्याच्या टाकीतून ३०० लिटर पाणी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. २१ दिवसानंतर पाणी येत असल्यानं अहिरे यांनी घरातील भांड्यासह छतावरील टाकीतही पाणी भरून ठेवलं होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी छतावरील पाण्याच्या टाकीतील अंदाजे २५० ते ३०० लिटर पाणी चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. टाकीतील पाणी अचानक कमी कसे झाले असा प्रश्न त्यांना पडला. त्यानंतर अहिरे यांनी एक तक्रार पोलिसांत लिहून दिली आहे. त्यामध्ये त्यांनी पाणीचारोचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांना केलं आहे.

आता या पाणीचोराचा शोध सुरू असून, छतावरचे पाणी चोरीला गेले कसे, याची चर्चा सुरू आहे. पाण्याची चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आहिरे यांनी केली आहे.