नगर : चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा टाकून तिचा खून केल्याच्या आरोपावरून जिल्हा न्यायालयाने प्रवीण ऊर्फ अप्पा गोपाळ गडाणे (३६, रा. विळद, गवळी वाडा, नगर) याला जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा  सुनावली. दंड न भरल्यास सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. या गुन्ह्य़ात प्रवीण हा स्वत:हूनच पोलीस ठाण्यात हजर झाला होता व त्याने खुनाची माहिती पोलिसांना दिली.

जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एम. कुलकर्णी यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील जी. के. मुसळे यांनी काम पाहिले. गुन्ह्य़ाचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी केला होता. वकील मुसळे यांना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी, हवालदार महेश जोशी यांनी सहाय केले. खटल्याच्या सुनावणीत सरकारतर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले.

शहराजवळील विळद येथे राहणारा प्रवीण गडाणे हा पत्नी स्वाती हिच्या चारित्र्याचा संशय धरून तिला नेहमी मारहाण करत असे. स्वातीचा भाऊ कैलास हातरुणकर याने प्रवीणला समजावूनही सांगितले होते. परंतु प्रवीणच्या मनातील पत्नीविषयीचा संशय दूर झालेला नव्हता. ६ मे २०१८ च्या पहाटे ५ च्या सुमाराला स्वाती ही झोपेत असतानाच प्रवीण याने तिच्या डोक्यात दगडी पाटा टाकून गंभीर जखमी केले व तीने आरडाओरड करू नये, यासाठी तिच्या तोंडावर उशी दाबून धरली होती. घटनेनंतर प्रवीण स्वत:हून एमआयडीसी पोलिसांकडे हजर झाला व त्याने खुनाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी स्वातीचा भाऊ कैलास हातरुणकर याच्यासह घटनास्थळी धाव घेतली होती.