12 December 2018

News Flash

मांढरदेवमध्ये काळेश्वरी देवीच्या यात्रेला प्रारंभ

मांढर गडावर किमान पाच ते साडेपाच लाख भाविक

Mandhardev kaleshwari devi fair : काळेश्वरी देवीच्या छबीना मिरवणुकीने या यात्रेचा प्रारंभ झाला. गावाला प्रदक्षिणा घालून पालखी पहाटे मंदिराच्या पारावर आली. यावेळी संपूर्ण मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

‘बोल मांढरच्या काळीचं चांगभलं ‘च्या जयघोषात मंगळवारपासून मांढरदेव येथे काळेश्वरी देवीच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी मांढर गडावर गर्दी केली आहे. मध्यरात्रीपासूनच भाविकांनी परिसरात गर्दी करायला सुरूवात केली होती. सकाळी आठनंतर ही गर्दी आणखी वाढली. अकरा वाजण्याच्या सुमारास मांढर गडावर किमान पाच ते साडेपाच लाख भाविक होते.
मांढरदेव देवस्थान ट्रस्ट आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढा , ट्रस्टचे अध्यक्ष अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश चव्हाण , प्रांताधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार अतुल म्हात्रे, पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, मांढरदेवचे ग्रामस्थ हजारो भाविकांच्या उपस्थितीत काळेश्वरी देवीची महापूजा करण्यात आली. दरवर्षी पौष पौर्णिमेला याठिकाणी यात्रा भरते. महिनाभर चालणाऱ्या या यात्रेत मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमा अमावस्येला भाविकांची मोठी गर्दी होते.

काळेश्वरी देवीच्या छबीना मिरवणुकीने या यात्रेचा प्रारंभ झाला. गावाला प्रदक्षिणा घालून पालखी पहाटे मंदिराच्या पारावर आली. यावेळी संपूर्ण मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. देवीला सुवर्णालंकार घालण्यात आले आहेत. परंपरेप्रमाणे सकाळी आठ वाजता बोपदेव ता. पुरंदर येथील ग्रामदैवताची पालखी टाळमृदंगाच्या गजरात याठिकाणी आली. मांढरदेव येथे काळेश्वरीच्या दर्शनासाठी भेटीसाठी आलेल्या भाविकांमुळे येथील परिसरात वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. दरम्यान, प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार वाई आणि भोर येथे कसून वाहन तपासणी केली जात आहे. यंदा यात्रेदरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून बिब्बा, बाहुल्या, लिंबे विकणे, झाडांवर खिळे ठोकणे, मंदिर परिसरात नारळ फोडणे आणि तेल वाहण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

First Published on January 2, 2018 2:34 pm

Web Title: mandhardev kaleshwari devi fair started from today